गावठी हातभट्ट्यांवर लोणीकंद पोलिसांची कारवाई
वाघोली : लोणीकंद पोलीसांनी एकाच दिवशी तुळापुर व भावडी परिसरातील एकूण तीन गावठी हातभट्टी व दारु विक्रेत्यांवर छापा मारून कारवाई केली आहे.
मंदाबाई जंगलु गुडावत (रा. भावडी रोड, ता. हवेली, जि. पुणे), हिराबाई कांताराम मिडे, ईश्वर नामदेव जठार (रा. शिवले वस्ती, तुळापुर) यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे चालू असल्याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रविवारी (दि. २८ जुलै) लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, (गुन्हे) निलेश जगदाळे यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे व पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल यांच्या दोन टिम तयार करुन हद्दीत अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर छापे मारून कारवाई करण्यात आली.
भावडी गावचे हद्दीत कैलास हांडगर यांचे शेतालगत अर्धवट बांधकाम असलेल्या घराचे मागे मोकळया जागेत चालू असलेल्या हातभट्टीवर कारवाई करुन एकूण ३ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर मौजे तुळापूर येथे कारवाई करुन १५०० रुपये किमतीची हातभट्टीची गावठी तयार दारु नष्ट करण्यात आली.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त विजयकुमार मगर, सहा. पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे, शुभम चिनके, परमेश्वर आघाव, महिला पोलीस अंमलदार राणी मोटे यांनी केली आहे.