Video : सामाजिक कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल
गंभीर आरोपामुळे शिरुर पोलिसांची प्रतिमा मलीन

शिरूर : निमोणे मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील पोलीस चौकीतील एका पोलिस अधिकाऱ्याने हरियाणा येथील अपघातग्रस्त गाडी मालकाकडून दहा हजारांची मागणी करत पाच हजारांची रक्कम स्वीकारल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते उमेश रणदिवे यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांची प्रतिमा मलीन झाली असून पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक तसेच शिरुरचे उपविभागीय अधिकारी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालणार का? अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
मांडवगण पोलिस चौकीच्या हद्दीत एक हरियाणा येथील एका व्यक्तीची चारचाकी गाडी (डीएल १० सीके ७५११) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सात ते आठ फूट खड्यात गेली होती. सध्या पाऊस चालु असल्याने गाडी खड्यातुन बाहेर काढण्यासाठी स्थानिक तरुणांनी ट्रॅक्टर व जेसीबीच्या साह्याने दोरी बांधून गाडी बाहेर काढली. पाऊसामुळे चिखलात त्यांचे हातपाय व कपडे खराब झाले. परंतु तरीही परप्रांतीय व्यक्तीला मदत करत तरुणांनी माणुसकी दाखवत चारचाकी गाडी बाहेर काढली.
सदर व्यक्ती मदत करणाऱ्या या तरुणांना जेवणासाठी पैसे देत होता. पण तरुणांनी ते नम्रपणे नाकारले. पण एका पोलीस अधिकाऱ्याने मात्र चारचाकी गाडीची चावी काढून घेत ‘त्या’ व्यक्तीकडे दहा हजारांची मागणी केली. तसेच तडजोडीनंतर पाच हजार रुपये घेतले. यामुळे व्यथित झालेल्या एका उमेश रणदिवे नावाच्या तरुणाने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकत सदर प्रकरण उघडकीस आणले.
एखाद्या पोलिस अधिकाऱ्याच्या चुकीच्या वागण्याने संपुर्ण पोलीस प्रशासनाची बदनामी होत असुन सदर प्रकार हा महाराष्ट्र पोलिसांच्या व प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या चांगल्या कार्याला काळीमा फासण्याचा प्रकार असुन संबंधित अधिकाऱ्याने त्या व्यक्तीचे पैसे परत करावेत अन्यथा मांडवगण फराटा येथील चौकात शर्ट अंथरुन भीक मागुन सदरच्या अधिकाऱ्याला पैसे कमी पडत असतील तर देणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.
कार्यकाळ पुर्ण होऊनही वर्षानुवर्षे तिथेच नोकरी
पुणे ग्रामीण पोलिस दलात अनेक कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ पुर्ण होऊनही त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. लोकसभेच्या पार्श्वभुमीवर एकाच जिल्ह्यात तसेच तालुक्यात कार्यकाळ पुर्ण झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र पुणे जिल्ह्यात तसेच शिरुर तालुक्यात कार्यकाळ पुर्ण होऊनही काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच तालुक्यात काम केल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाकच उरलेला नसल्याने सगळीकडे मनमानी कारभार चालू असल्याचे चित्र आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख आता तरी एकाच तालुक्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या सरकारी जावयांच्या बदल्या करणार का? अशी शिरुर तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.