विभागीय भरारी पथकाची गोवा राज्य निर्मात मद्य वाहतूकीवर मोठी कारवाई
एकूण २१ लाख ६९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
पुणे : उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने निरा गावच्या हददीत, पालखी तळालगत, पुणे-लोणंद रोडवरती, (ता. पुरंदर जि. पुणे) या ठिकाणी पकडलेल्या वाहनातगोवा बनावटीचे व विक्रीस असलेल्या विदेशी मद्याच्या १८० मिली क्षमतेच्या ७६८० सिलबंद बाटल्या. (१६० बॉक्स) मिळून आले. १३ लाख ८२ हजार ४०० रूपये किंमतीच्या मद्य साठयासह अशोक लेलॅण्ड् कंपनीचा ग्रे रंगाचा चारचाकी टेम्पो वाहन क्र. (एमएच ०३ / सीव्ही ९४६८) व इतर साहीत्य असे २१ लाख ६९ हजार ४०० रूपये किंमतीचा मुददेमाल पथकाने जागीच जप्त केला. संजय राम खेलावन कनोजिया, (वय-४०, रा- १०७, ओम साई पॅलेस, साई दिप जवळ, जुलवा, सुरत, गुजरात) व अभिजित दिलीप भगत ( वय-२९, रा- सी/१११, सुर्या, सी.एच.एस. लि. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे रोड, टोल नाका जवळ, चेक नाका, प्रभात कॉम्प्लेक्स, दहिसर (पुर्व), मुंबई) यांना अटक करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त मुंबई डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे यांच्या आदेशान्वये विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग या पथकाने वाहनांच्या तपासणी दरम्यान निरा गावचे हददीत, पालखी तळालगत, पुणे लोणंद रोडवरती, (ता. पुरंदर, जि. पुणे) या ठिकाणी अशोक लेलॅण्ड् कंपनीचा बडा दोस्त मॉडेलचा ग्रे रंगाचा चारचाकी टेम्पो वाहन (क्र. MH०३ / CV ९४६८) या वाहनास थांबवून सदर वाहन चालकाकडे वाहनामध्ये काय आहे याबाबत चौकशी केली. वाहन चालकाने वाहनामध्ये औषधाचे साहीत्य असुन ते मी पुण्याहून-नंदुरबार याठिकाणी घेवून जात आहे असे सांगितले. परंतु मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार सदर वाहनाची खातरजमा करण्याकरीता सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गोवा बनावटीचे व विक्रीस असलेल्या विदेशी मद्याच्या १८० मिली क्षमतेच्या ७६८० सिलबंद बाटल्या असे १६० बॉक्स मिळून आले. वाहनातील इसमांकडे मद्य वाहतूकीचे संदर्भातील कोणताही वाहतूक पास, परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. तसेच सदरचा मद्य साठा विक्री करण्याचे उददेशाने वाहतूक करुन आणल्याचे आरोपींच्या तपासातून स्पष्ट झाल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करुन सदर ठिकाणावरुन वरील वर्णनाचा रुपये १३ लाख ८२ हजार ४०० रूपये किंमतीच्या मद्य साठयासह अशोक लेलॅण्ड् कंपनीचा बडा दोस्त मॉडेलचा ग्रे रंगाचा चारचाकी टेम्पो वाहन इतर साहीत्य असा एकूण २१ लाख ६९ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला. तर जप्त वाहनामध्ये मिळून आलेले संजय कनोजिया व अभिजित दिलीप भगत यांना सदर गुन्हयामध्ये अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील व व्हि. एम. माने, जवान पी. टी. कदम, एस. एस. पोंधे, ए. आर. थोरात, एस.सी.भाट, आर. टी. तारळकर, शशांक झिंगळे व महिला जवान यु. आर. वारे तसेच वाहनचालक ए. आर. दळवी यांनी सहभाग घेतला असून सदर गुन्हयांचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील हे करीत आहेत.