घरफोडी करणारा सराईत जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाची कामगिरी; दोन गुन्ह्यांचा उकल
पुणे : लोणीकंद, कोंढवा पोलीस ठाण्यासह विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी, वाहन चोरीच्या गुन्ह्यातील सराईताला गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने आव्हाळवाडी गावच्या हद्दीत नीळकंठेश्वर मंदिराजवळ मोठ्या शिताफीने पकडून जेरबंद केले आहे. त्याचेवर विविध पोलीस ठाण्यात वीस गंभीर गुन्हे दाखल असून त्याचेकडून दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महेश ऊर्फ महया काशिनाथ चव्हाण (वय १९ रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे जेरबंद केलेल्या सराईताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक गस्तीवर असताना शनिवारी (१० ऑगस्ट) पोना नितीन मुंढे यांना पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हा आव्हाळवाडी गावचे हृददीत निळकंठेश्वर मंदिराजवळ मोकळया मैदानात थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली. सदर ठिकाणी पथकाने सापळा रचला. पोलीस असल्याचे लक्षात येताच येथून पळ काढणाऱ्या सराईताला पथकाने मोठ्या शिताफीने पकडले.
पथकाने त्याला ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याचे खिशात सोन्याचे दागिने मिळून आले. अधिक चौकशी केली असता त्याने इतर साथिदारांसह कोलवडी व कोंढवा परिसरात घरफोडी केल्याचे सांगून सोन्याचे दागिने हे त्यातीलच असल्याची कबुली दिली. अभिलेख तपासले असता त्याचेवर लोणीकंद, कोंढवा, वानवडी, चंदननगर, हडपसर, भारती विदयापीठ पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व वाहनचोरी सारखे एकूण २० गंभीर गुन्हे दाखल आहेत.
लोणीकंद, कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या दोन्ही गुन्हयातील ३४.५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह-आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२), सतीश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन चाडगे, समीर पिलाने, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे, सुहास तांबेकर यांनी केली आहे.