खुनातील गुन्हेगारांना पकडण्यास येरवडा पोलिसांना यश
येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या दोन खुनाच्या घटना
येरवडा : येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ पकडण्यास येरवडा पोलीसांना यश आले असून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
येरवडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ जून रोजी राजीव गांधीनगर येरवडा येथे आरोपी इस्माईल शेख याच्या बहिणीने कठळू लहाने यांच्या मुलाबरोबर आंतरधर्मीय विवाह केला होता. याच रागातून त्याने झाडाखाली बसलेल्या कठाळू यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून केला होता. यानंतर इस्माईल हा संकेत गुप्ता याच्याबरोबर दुचाकी वर बसून फरार झाला होता. दाखल गुन्हा अन्वये तपास करत असताना पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी नामे इस्माईल शेख व त्याचा साथीदार हे संजयपार्क येथे थांबलेले आहेत. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटिल व तपास पथकाचे अंमलदार यांनी तेथे जावून बातमीप्रमाणे दोन इसम थांबलेले दिसून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता इस्माईल रियाज शेख ( वय २३ वर्षे रा.राजीव गांधी नगर, येरवडा, पुणे) व संकेत उमेश गुप्ता (वय २१ वर्षे रा. राजीव गांधीनगर येरवडा) असे असल्याचे सांगितले. चौकशी करता त्यांनी गुन्हयाची कबूली दिल्याने व त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झालेने त्यांना अटक करुन १२ तासांचे आत येरवडा पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.तर दूसऱ्या घटनेत १९ जुन रोजी कस्तुरबा हौसिंग सोसायटीचे मागील नाल्यामध्ये चेंबर बांधण्याचे काम करीत असताना चिखल अंगावर उडाला म्हणून आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन दगडाने मारुन जबर जखमी केले. फिर्यादी हे दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झाले. सदर गुन्हयातील आरोपी हे रहात्या घरी असल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, कैलास डुकरे यांना मिळाली. उपनिरीक्षक स्वप्नील पाटिल व तपास पथकाचे अंमलदार यांनी तेथे जावून शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. प्रणव वाल्मीक अनंत्रे (वय २० वर्षे रा दिघी, पुणे) व राज सोमनाथ परदेशी (वय १९ वर्षे मु. पो. कुरुळी ता. खेड, पुणे ) असे असल्याचे सांगितल्याने त्याचेकडे चौकशी करता त्यांनी गुन्हयाची कबूली दिल्याने व त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त विजय दबडे, वरीष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी उपनिरिक्षक स्वप्निल पाटील, हवालदार गणपत थिकोळे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे , पोलीस नाईक सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केली आहे.