अवघ्या २४ तासात खुनातील आरोपी जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाची कामगिरी

पुणे : निर्जन स्थळी नेऊन लाकडी दांडक्याने व धारदार शस्त्राने एका तेवीस वर्षीय तरुणाचा खून करून बुलेट गाडीवरून कर्नाटकाकडे पळून जाण्यासाठी निघालेल्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मोठ्या शिताफिने अवघ्या चौवीस तासात पकडून जेरबंद केले आहे.
अरविंद अमृत कांबळे (वय २६ रा मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे), रोहित हुनमंत पुटगे (वय १९ रा. गोकुळ नगर, कात्रज, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर माविया लियाकत हुसेन पठाण (वय २३ रा अश्रफनगर, कोंढवा, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लुल्लानगर वानवडी (पुणे) परिसरातील विक्रमबात्रा वसाहतीसमोर केंद्रीय महाविद्यालयाच्या बाजूला एका तेवीस वर्षीय तरुणाचा लाकडी दांडक्याने व धारदार शस्त्राने खून झाल्याप्रकरणी २४ मे रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक तपास करत होते. परंतु खून झालेल्या तरुणाची ओळख पटविणेबाबत पोलिसांना उपयुक्त माहिती मिळत नसल्याने आरोपींचा शोध घेणे जिक्रीचे झाले होते. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करून रवाना केली.
शोध पथकाला मयत तरुण हा कोंढवा, वानवडी भागातील असल्याचे समजल्याने त्या परिसरात मयताचा फोटो दाखवून ओळख पटवत असताना बातमीदार मार्फत मयत हा कोंढवा येथील अश्रफनगर गल्ली नंबर ११ (पुणे) येथील रहिवासी असून त्याचे नाव माविया लियाकत हुसेन पठाण (वय २३) असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने अधिक तपास केला असता मयतचे दाजी अरविंद अमृत कांबळे यांच्याबरोबर कौटुंबिक वाद असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तपासाचा वेग आणखीनच वाढवला. दरम्यान तपास पथकाचे उपनिरीक्षक अविनाश लोहोटे यांना अरविंद कांबळे हा त्याच्या साथीदारासह बुलेट गाडीने कर्नाटकाकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ नाकाबंदी करून कोंढवा येथील कान्हा हॉटेल चौकात पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु कांबळे हा साथीदासह युटर्न घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस पथकाने झडप घालून त्याला पकडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांना दोघांना अटक केली असून बिबेवाडी, वाकड, मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात कांबळे याचेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) अमोल झेंडे, सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अमंलदार राजस शेख, पृथ्वीराज पांडूळे, शशिकांत नाळे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अमित कांबळे, रमेश साबळे, अकबर शेख, पांडूरंग कांबळे, स्वाती गावडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली आहे.