महाविद्यालयीन तरुणाच्या खुनातील आरोपी जेरबंद
लोणीकंद पोलीस तपास पथकाची कामगिरी; वाघोलीतील बकोरी रोड येथील घटना; समलैंगिक प्रेमप्रकरणातून केला होता खून
पुणे : समलैंगिक प्रेमप्रकरणातून वाघोली येथील बकोरी रोड परिसरात महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने वार करून फरार झालेल्या मारेकऱ्यास लोणीकंद पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. खून करून चेन्नईला फरार झालेल्या मारेकऱ्यास चेन्नई हून परतल्यानंतर दौंड येथील टोल नाका येथून सापळा रचून ताब्यात घेतले.
सागर अशोक गायकवाड (वय ३२ रा. पारगाव, दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील बकोरी रोड परिसरात मंगळवारी (दि.२८) दुपारी समलैंगिक प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुण महेश डोके (वय २१) या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. तेथील एका जागरूक नागरिकाने जोरात ओरडत हल्ला झालेल्या तरुणाच्या मदतीसाठी धाव घेतल्याने हल्लेखोर हा त्याठीकाणाहून फरार झाला होता. डोके यास ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड याच्या शोधासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी दोन तपास पथके रवाना केली होती.
हल्लेखोर हा दुचाकीवरून केडगाव व त्याच्या पारगाव येथील घरी गेला होता. त्यानंतर त्याने यवत येथून नातेवाईकाकडून पैसे घेऊन मिळेल त्या रेल्वेत बसण्यासाठी गेला. तो चेन्नईच्या रेल्वेमध्ये बसून फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्याशी संबंधित सर्व माहिती घेऊन तांत्रिक कौशल्याद्वारे तपास सुरु ठेवला होता. आरोपी चेन्नईहून पुन्हा पुण्यातील दौंड टोल नाक्यावर येत असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत तपास पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि गोडसे, सहा. फौजदार बाळासाहेब सकाटे, पोना स्वप्नील जाधव, पोना अजित फरांदे या पथकाने दौड रेल्वे स्टेशन परीसरात सापळा रचला. परंतु आरोपी मौजे गारगाव रेल्वे फाटक येथील सिग्नलला रेल्वे थांबल्याने रेल्वेतून खाली उतरुन निसटून जाण्याच्या प्रयत्नात असताना मोठ्या शिताफीने पकडण्यात यश मिळवले. आरोपीला ताब्यात घेवून अटक करण्यात आली.
कृष्णकांत यादव यांचे पोलिसांकडून कौतुक
महेश डोके याच्या पाठीमागे सागर गायकवाड कोयता घेऊन पळत असताना तेथील जागरूक नागरिक कृष्णकांत यादव यांनी पाहिल्यानंतर ते जोरात ओरडून मदतीसाठी खाली मैदानात आले. त्यावेळी गायकवाड दुचाकीवरून फरार झाला असला तरी रक्तबंबाळ झालेल्या डोके यास त्यांनी स्वतःचा टी शर्ट काढून रक्तस्त्राव थांबविण्याच्या प्रयत्न केला. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावून जखमीस एका रिक्षाचालकाच्या मदतीने वाघोलीतील लाईफ लाईन हॉस्पिटलला नेले. हॉस्पिटलला नेताना जखमी डोके हा डोळे झाक करीत असताना देखील यादव यांनी त्याच्याशी धाडसाने बोलून नाव, हल्लेखोराचे नाव व हल्ल्याचे कारण विचारून घेतले. वाघोली येथे प्रथमोपचार करून ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना देखील यादव हे जखमी डोके याच्यासोबत होते. ससूनमध्ये जाण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. यादव यांनी या सर्व परीस्थितीतही लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाची फिर्याद दिली. अवघ्या सात दिवसांवर कृष्णकांत यादव यांचे लग्न आलेले असताना सुद्धा माणुसकीच्या नात्याने त्यांनी बघ्याची भूमिका न बजावता जखमी डोके याच्यासाठी केलेली मदत पोलिसांना खूपच फायदेशीर ठरली. कोयत्याने वार झालेल्या तरुणाशी काडीमात्र संबंध नसताना देखील यादव यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक लोणीकंद पोलिसांनी केले आहे.
सदरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मारुती पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, सहा. फौजदार बाळासाहेब सकाटे, पोह संदेश शिवले, पोना स्वप्निल जाधव, पोना अजित फरांदे, कैलास साळुंके, पोशि अमोल ढोणे यांनी केली आहे.