मनपाच्या अर्थसंकल्पात वाघोलीच्या १३ कोटींच्या विकास कामांचा समावेश
माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांची माहिती
वाघोली : पुणे महानगरपालिकेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात वाघोली मधील रस्ता, सांडपाणी, पिण्याचे पाणी आदी कामांचा समावेश करण्यात आला असून जवळपास १३ कोटी ४० लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे व उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी दिली.
माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे व उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी सांगितले की राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार जवळपास पाच कोटी ४३ लाख रुपयांच्या विकास कामांचा मनपा प्रशासनाने अर्थसंकल्पात समावेश केला आहे. वाघोलीच्या विकासात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे योगदान असल्याचे रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत दादा पाटील, आमदार राहुल कुल, प्रदीप कंद यांनी देखील निधी मिळवून देण्यासाठी मोलाची मदत व सहकार्य केले आहे असे दाभाडे यांनी सांगितले.
केसनंद रोड ते हिल शायर सोसायटी रस्ता करणे ४० लाख रुपये, बायफ रोड-कांचनपुरम सोसायटी ते फकिरबाबा वाडा रस्ता करणे ३० लाख रुपये, वाघेश्वर मंदीर ते दशक्रिया विधी घाट पर्यंत दगडी फरशी टाकणे, ४० लाख रुपये, बकोरी रोड ते न्यात्ती सोसायटी, जेएसपीएम कॉलेज रस्ता करणे 80 लाख रुपये, म्हसोबा मंदिर ते गुलमोहर प्राईमरोझ सोसायटी रस्ता करणे ३० लाख रुपये,ओझोन व्हीला सोसायटी ते डिकॅथलॉन मेन ड्रेनेज लाईन करणे २ कोटी ७३ लाख रुपये, खराडी ते साईसत्यमपार्क पर्यंत पिण्याचे पाणी पाईपलाईन करणे ५० लाख रुपये, वाघेश्वर चौक ते बायएफ रोड सर्विस रस्ता करणे ८० लाख रुपये, वाघोली परिवहन मंडळाच्या केसनंद फाटा बीआरटी बस स्थानकात रस्ता व इतर कामे करणे ८० लाख रुपये, वाघोली गावठाण ते बकोरी फाटा रस्ता विकसित करणे ४ कोटो ५० लाख रूपये, वाघोली ते आय व्ही स्टेट कडे जाणारा अंतर्गत रस्ता विकसित करणे १ कोटी ८० लाख रुपये, वाघोली येथील प्रकाश दिवे व्यवस्था करणे ७ लाख ५० हजार रुपये आदी विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. वाघोलीकरांनी या निधीचे स्वागत केले असून दाभाडे व भाडळे यांचे अभिनंदन होत आहे.