प्रक्रिया न करताच खड्डा खोदून जिरवला कचरा
महापालिका आरोग्य विभागाचा प्रताप
लोहगाव : लोहगाव मधील महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना कचरा उचलणे शक्य होत नसल्याने कचरा चक्क आहे त्याठिकाणी खड्डा खोदून गाडन्यात आला आहे. कचरा उचलून ओला, सुका वेगळा करुन तो प्रोसेसिंगसाठी पाठवणे गरजेचे असताना कचरा उचलणे शक्य नसल्याने खड्डा खोदून गाडण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली आहे. नियमबाह्य कचऱ्याची अशा पद्धतीने विलहेवाट लावणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. सोमवार (दि. १७ जुन) लोहगाव हद्दीत निरगुडी रोडवर, किर्ती गेट समोर सुमारे १० टन कचरा जेसीबीने गाडला आहे. लोहगाव मध्ये सर्वत्र असे कचऱ्याचे ढीग झाल्याने आरोग्य विभागाने तो उचलून प्रोसेसिंग ला पाठवण्या ऐवजी आहे त्याठिकाणी खड्डा खोदून कचरा जेसीबीच्या साह्याने जमिनीत गाडला आहे. कचरा आहे त्याठिकाणी जमिनीत गाडणे, जाळणे हे घनकचरा विभागाच्या नियमात बसत नाही. तरी देखील असा प्रकार लोहगाव आरोग्य कोटीच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱयांनी केला आहे. महापालिकेकडे एवढी यंत्रणा असतानाही अशी वेळ का आली असा प्रश्न लोहगाव मधील सुज्ञ नागरीक विचारू लागले आहेत. नियमबाह्य काम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत विभागीय आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, कचरा जमिनीत पुरल्याबाबत तक्रार प्राप्त झाली असून याची पूर्ण चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.