Video : वाघोली-लोहगाव मुख्य रस्त्यावरून वाहतो महापूर
नकाशावरील नैसर्गिक ओढे, नाले खुले करण्याची मागणी; जनजीवन विस्कळीत

पुणे : लोहगाव-वाघोली रोडवरील कर्मभूमी नगर, योजना नगर तसेच एअरपोर्ट जवळील खेसे पार्क, साठे वस्ती यासह लोहगाव परिसरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पुणे-नगर महामार्गासह वाघोली-लोहगाव मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्त्यांना पुराचे स्वरूप आले आहे. तात्काळ नैसर्गिक नाले खुले करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मागील काही दिवसांपासून झालेल्या धुंवाधार पावसामुळे पुणे-नगर महामार्ग, वाघोली-लोहगाव परिसरातील मुख्य रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पावसाळी नाल्या अभावी व आहेत त्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली नसल्याने पर्यायाने पाणी रस्त्यांवरून प्रचंड वाहत आहे. शनिवारी (दि. ८ जून) रात्रीपासून रविवारी दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्याप्रमाणावर पाणी वाहत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनचालक अडकून पडले आहेत. हातावर उपजीविका असणाऱ्यांना कामावर जाताना मोठा सामना करावा लागत असल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
वाहनचालक या पाण्यामध्ये वाहने घालण्यासाठी घाबरत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने बंद पडली आहेत. शनिवार रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत पाणी कमी होत नसल्याने महापालिकेच्या कारभाराबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. नैसर्गिक नाले बुजवून त्यावर बांधकामे झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याची ओरड नागरिकांमधून केली जात आहे. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकाशावरील नैसर्गिक ओढे, नाले खुले करावेत अशी मागणी देखील या निमित्ताने जोर धरत आहे.
घरासमोर साचलेल्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
गेली काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. पावसाच्या पाण्याबरोबर वाहत आलेले ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी घरासमोर साचले आहे. त्यामुळे साप, विंचू या सारखे विषारी प्राणी घरात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांच्या सुरक्षिततेबरोबरच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.