वाघोलीतील सात धोकादायक होर्डिंग जमीनदोस्त
नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाश चिन्ह विभागाची कारवाई

♦ कारवाई दरम्यान केसनंद रोडवरील धोकादायक होर्डिंग काढण्याची स्थानिकाने केली लेखी तक्रार
♦ नागरिकांमधून केले जात आहे समाधान व्यक्त
♦ धोकादायक व गर्दीच्या ठिकाणी असलेले आणि रस्त्यालगतचे होर्डिंग काढण्याची मागणी
पुणे : वाघोली येथील पुणे-नगर महामार्गासह परिसरात धोकादायक होर्डिंगवर मनपा प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाश चिन्ह विभागाच्या पथकाने आव्हाळवाडी फाट्यावरील धोकादायक होर्डिंगसह सात होर्डिंग क्रेनच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. धोकादायक होर्डिंगवर केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर असून उपायुक्त किशोर शिंदे व नगर रोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोलीतील धोकादायक होर्डिंगवर गुरुवारी (३० मे) पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली आहे. आव्हाळवाडी फाटा येथील वर्दळीच्या ठिकाणी असलेले धोकादायक होर्डिंगसह अन्य ठिकाणचे सात होर्डिंग आकाश चिन्ह विभागाचे मुख्य निरीक्षक गणेश भारती यांच्या पथकाने क्रेनच्या सहाय्याने काढून जमीनदोस्त केले आहेत. होर्डिंग कारवाई चालू असतानाच वाघोली येथील एका स्थानिकाने वाघोली-केसनंद या राज्य मार्गावरील ईपिक सोसायटीजवळ वर्दळीच्या ठिकाणी असलेले धोकादायक होर्डिंग काढण्यात यावे अशी लेखी तक्रार दिली. त्यामुळे या होर्डिंगवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे.
वाघोली पुणे-नगर महामार्गासह परिसरातील धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आकाश चिन्ह विभागाचे मुख्य निरीक्षक गणेश भारती गणेश भारती यांनी सांगितले.
मनपा प्रशासनाने धोकादायक होर्डिंगवर केलेली कारवाई स्वागतार्ह आहे. परंतु शहरात मोठ्याप्रमाणावर होर्डिंग उभारण्यात आले असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून वेळीच गांभीर्याने लक्ष देवून अनधिकृत, धोकादायक व गर्दीच्या ठिकाणचे आणि रस्त्यालगत असणारे होर्डिंग काढण्यात यावे.
– प्रकाश जमधडे (सामाजिक कार्यकर्ते, वाघोली)
वाघोली-केसनंद या राज्य मार्गावरील ईपिक सोसायटीजवळ वर्दळीच्या ठिकाणी अंदाजे साठ ते सत्तर फुट धोकादायक होर्डिंग गेली काही वर्षांपासून उभे आहे. होर्डिंगलगत हॉटेल व अन्य व्यावसायिक आहेत. होर्डिंगच्या अगदी जवळून विद्युत तारा गेल्या आहेत. भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धोकादायक होर्डिंग काढण्यात यावे अशी लेखी तक्रार आकाश चिन्ह विभागाकडे केली आहे.
– ज्ञानेश्वर आव्हाळे (स्थानिक रहिवाशी, वाघोली)