सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा ऐरणीवर
सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका पोहचवण्याचा कट; शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
पुणे : सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या चारचाकी गाडील अज्ञात कार चालकाने त्यांच्या समोरुन भरधाव वेगाने कार आडवी मारून घातपात घडवण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी रात्री पाऊणे दहाच्या सुमारास तळेगाव-न्हावरा रोडवरील तोडकर वस्तीजवळ घडली आहे. याप्रकरणी भोरडे यांच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
निमगाव महाळुंगे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक भोरडे हे बुधवारी (दि.२९ मे) रात्री पाऊणे दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या टाटा टॅगो कारने तळेगाव ढमढेरे वरुन घरी जात होते. दरम्यान तळेगाव-न्हावरा रोडवरील तोडकर वस्तीचे जवळ कॅनॉल पाटाचे जवळ न्हावरा बाजूच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगात येत कार चालकाने भोरडे यांच्या कारला आडवी मारल्याने प्रसंगावधान राखत भोरडे यांनी त्यांची कार रस्त्याचे डावे बाजुला घेत बचाव केला. त्यानंतर भोरडे यांनी कार वळवून तळेगाव बाजार मैदान पर्यंत गेले. परंतु त्याठिकाणी तीन रस्ते असल्याने सदरची कार ही वेगाने कोणत्यातरी एका रस्त्याने निघून गेली. शेतीचे कामकाज असल्याने भोरडे तळेगाव रोडने त्यांच्या घरी गेले. काम आटोपल्यानंतर भोरडे यांनी जीवाला धोका असल्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली. भोरडे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार तेलंग हे करत आहेत.
घातपात घडवून आणण्याची शाशंकता
सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफियांच्या विरोधात केलेल्या तक्रारींमुळे गौण माफियांना कोट्यावधी रुपयेचा दंड आकारण्यात आला. महसूल, पोलिस आदी विभागातील अधिकाऱ्यांच्या तक्रारी देखील भोरडे यांनी केलेल्या आहेत. त्यांच्या तक्रारीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन चौकशी सुरु आहे.
भोरडे सातत्याने गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. त्याबरोबर निर्भीडपणे असामाजिक तत्त्वांविरुद्ध आवाज उठवतात. अनेकांना दंड झाल्याने व लोक सेवकांच्या चौकशा सुरु झाल्याने गौण खनिज माफीया व काही लोक सेवक यांकडून भोरडे यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यात नाकारता येत नाही. कोनाच्या तरी सांगण्यावरून घातपात घडवून आणण्याच्या हेतूने हा प्रकार केलेला असावा अशी शाशंकता भोरडे यांनी व्यक्त केली आहे.