वाघोलीतील वाईन शॉप स्थलांतरित करण्याची मागणी
वाईन शॉप प्रकरण थेट आमदार रवींद्र धंगेकरांच्या दालनात; उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे; महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस सदस्या सीमा गुट्टे यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा
पुणे : वाघोली-आव्हाळवाडी रोडवर असलेल्या वाईन शॉपचा भाडे करार संपून काही महिने उलटले. परंतु उत्पादन शुल्क व पोलीस अधिकाऱ्यांशी असलेल्या सलगीमुळे वाईन शॉप व्यावसायिक गाळा खाली करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. वाईन शॉप स्थलांतरित करण्याबाबत गाळा मालकाने राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही अद्यापही दुकान स्थलांतरित करण्यात आले नाही. त्यामुळे अखेर गाळा मालकाने सामाजिक कार्यकर्ते संदीप थोरात यांचेकडे मदतीची मागणी केली. संबधित अधिकारी वाईन शॉप व्यावसायिकाला सातत्याने पाठीशी घालत असल्याने थोरात यांनी हे प्रकरण थेट आमदार रवींद्र धंगेकर यांच्या दालनात नेल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाघोली-आव्हाळवाडी रोडवर उर्मिला अग्रवाल यांचा गाळा आहे. या गाळ्यामध्ये २०१७ मध्ये वाईन शॉप व्यावसायिकाने पाच वर्षांचा भाडे करार करून हे दुकान सुरु केले. करार संपल्याने थकीत भाडे देऊन दुकान अन्य ठिकाणी स्थांतरित करावे असे संबधित वाईन व्यवसायिकाला गाळा मालकाने सांगितले. परंतु वारंवार सांगून देखील वाईन व्यवसायिक गाळा खाली करत नसल्याने गाळा मालकाने राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांकडे तोंडी व लेखी तक्रारी केल्या. वाईन व्यावसायिकाची संबधित अधिकाऱ्यांशी असलेल्या सलगीमुळे दुकान स्थलांतरित करण्याऐवजी गाळा मालकास उलट अरेरावी करून टाळाटाळ करत आहे. तक्रारी देवून सुद्धा राज्य उत्पादन शुल्क व पोलीस अधिकारी वाईन व्यवसायिकाला पाठीशी घालत असल्याने अखेर गाळा मालकाने श्रीमंत गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते यांचेकडे मदतीची मागणी केली. त्यानुसार थोरात यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलिसांशी संपर्क करून गाळा मालकाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. परंतु वाईन शॉप व्यावसायिक गाळा खाली करत नसल्याने थोरात यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. मात्र तरी देखील अधिकाऱ्यांनी वाईन शॉप व्यावसायिकाला पाठीशी घालत कारवाईबाबत उदासीनता दाखवली. अखेर थोरात यांनी हे प्रकरण आमदार रवींद्र धंगेकर यांच्या दालनात नेले. आमदार धंगेकर यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन गाळा मालकाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. वाघोली येथील बेकायदेशीर वाईन शॉपवर कारवाई करावी अशी मागणी थोरात यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांचेसह अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वाघोली येथील वाईन शॉप स्थलांतर करणेबाबतचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संजय कोल्हे तात्काळ बनवून वरिष्ठांकडे सादर करणार आहेत. – अभय आवटे (उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क)
संबधित विभागाकडे गाळा मालक अनेक महिन्यांपासून वारंवार लेखी तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयामध्ये आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन करण्यात येईल. – सीमा गुट्टे (सदस्या, महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस)