Video: वीज वाहिन्यांवर धोकादायक होर्डिंग

नागरिकांच्या जीवाशी खेळ; कमकुवत होर्डिंगमुळे दुर्घटनेची शक्यता

पुणे : वाघोली येथे पुणे-नगर रोडसह परिसरात अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांजवळ महावितरणची एनओसी न घेताच होर्डिंग उभारण्यात आले आहेत. होर्डिंगच्या खाली अगदी काही फुटावर वीज तारा असल्याने भविष्यात दुर्घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज वाहिन्यांजवळ होर्डिंगला संबधित विभागाने परवानगी कशी दिली असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

वाघोली येथे नगर रस्त्यासह परिसरात मोठ्यासंख्येने होर्डिंग आहेत. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर होर्डिंग उभारले आहेत. होर्डिंग उभारण्यासाठी महावितरणकडून कुठलीही परवानगी घेतली गेली नाही. घाटकोपरची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. जोराच्या वाऱ्यामुळे होर्डिंगचे फाटलेले फ्लेक्स उडून विद्युत वाहिन्यांवर गुंडाळले जातात. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो. अशावेळी वीज पुरवठा सुरळीत करताना विद्युत महावितरणला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.

नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहा. आयुक्त सोमनाथ बनकर व परवाना निरीक्षक हाशम पटेल यांचेशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

कमकुवत होर्डिंगमुळे दुर्घटनेची शक्यता  

अनेक वर्षांपासून काही वर्दळीच्या ठिकाणी उभे असलेले होर्डिंग ऊन, वारा, पाऊस यामुळे गंजून कमकुवत झाल्याची शक्यात आहे. अशा कुमकुवत होर्डिंगची परवाना व आकाश चिन्ह विभागाने पाहणी करणे गरजेचे आहे अन्यथा घाटकोपरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एप्रिल महिन्यात एकूण ९६ होर्डिंगचे फ्लेक्स उडून तारांवर पडले होते. तसेच उबाळेनगर परिसरात एक होर्डिंग उच्च दाबाच्या वाहिनीवर पडले होते सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

अद्यापपर्यंत महावितरणकडून होर्डिंगसाठी एनओसी घेतलेली नाही. होर्डिंगला परवानगी देताना त्याठिकाणाहून लघु व उच्च दाबाची वीज वाहिनी जाते का याची पाहणी करावी. वाहिनी जात असेल तर संबधित विभागाने महावितरणच्या एनओसी शिवाय होर्डिंगला परवानगी देवू नये.

– दीपक बाबर  (सहा. अभियंता, वीज महावितरण, वाघोली)  

संबधित विभागाने केवळ टॅक्ससाठी होर्डिंगला परवानगी न देता सदर ठिकाणची पाहणी करूनच परवानगी द्यावी. पावसाळा तोंडावर आला असून होर्डिंगलगतच विद्युत वाहिन्या गेल्याने दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. वाघोली येथे होर्डिंग कोसळल्याच्या दोन घटना घडल्या असून नागरिकांच्या जीवाशी खेळणे योग्य नाही.

– सुधीर दळवी  (सामाजिक कार्यकर्ते, वाघोली )    

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button