कारवाई टाळण्यासाठी होर्डिंगधारकांनी लढवली शक्कल
होर्डिंगवरील जाहिरात फ्लेक्स ठेवले काढून; मनपा आयुक्तांचे धोकादायक व अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचे निर्देश; लोहगाव, वाघोली परिसरातील धोकादायक होर्डिंगवर होणार कारवाई

वडगावशेरी : मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिका प्रशासनही सतर्क झाले आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंगसह धोकादायक होर्डिंगवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कारवाई करू नये म्हणून येरवडा आणि नगर रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील होर्डिंगधारकांकडून होर्डिंगवरचे जाहिरात फ्लेक्स काढून ठेवण्यात आले आहेत. लोखंडी सापळा मात्र तसाच आहे. तर महापालिका प्रशासनाने मात्र वाऱ्याला अडथळा ठरु नये म्हणून जाहिरात फ्लेक्स काढण्याच्या सूचना होर्डिंग धारकांना देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आतापर्यंत १६ होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे तर येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील केवळ एका होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे. नगररोड व येरवडाच्या परीसरात सर्वाधिक नियमबाह्य होर्डिंग आहेत. दुकान गाळा, फुटफाथ, जुन्या इमारती, मुख्य चौक याठिकाणी नियमबाह्य होर्डींग आहेत. साईज कमी असताना एकाला एक जोडण्यात आले आहेत. हीच परिस्थिती वाघोलीसह अनेक ठिकाणी आहे.
होर्डिंगधारकांनी कारवाई टाळण्यासाठी होर्डिंगवरून जाहिराती काढून नवीन पद्धतीचा अवलंब केला आहे. शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी करून अनधिकृत व धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले असले तरी क्षेत्रीय कार्यालय स्तरावरचे आकाश चिन्ह विभागाचे अधिकारी यांची होर्डींगधारकांशी सलगी असल्यामुळे कारवाई होत नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
शहरातील सर्व होर्डिंगची फेर तपासणी करून धोकादायक व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. नगररोड, येरवडा, धानोरी, लोहगाव, वाघोलीसह अनेक भागातील होर्डिंग्जवरून जाहिराती गायब आहेत. कारवाई टाळण्यासाठी काही दिवस वातावरण शांत होईपर्यंत होर्डिंगवर जाहिराती न लावून बोळवण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडील आकाशचिन्ह विभागाचे निरीक्षक प्रवीण गाडे म्हणाले, जोरदार वाऱ्यामुळे वारा थांबून होर्डिंग पडू नये यासाठी जाहिरात फलक काढण्यात आले आहेत. परवानाधारक होडिंग धारकांना स्ट्रक्चर स्टॅबिलिटी मागवली आहे. धोकादायक होर्डिंग असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
लोहगाव, नगर रोड, खराडी, चंदननगर वाघोली परिसरातील धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे आकाश चिन्ह निरीक्षक गणेश भारती यांनी सांगितले.
होर्डिंगमुळे झाडांचा कोडंतोय श्वास
गोल्फ क्लबच्या आतील आणि विश्रांतवाडीतील जय गणेश विश्व जवळील चौकात असलेल्या होर्डिंगच्या लगत पिंपळाचे वृक्ष आहे. होर्डिंगमुळे हा वृक्ष दबला गेल्याने वृक्ष वाढीसाठी अडथळा ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणचे होर्डिंग काढून टाकण्यात यावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
कमकुवत होर्डिंग ठरू शकतात धोकादायक
पुणे-नगर महामार्गासह वर्दळीच्या ठिकाणी अनेक वर्षांपासून काही होर्डिंग उभे आहेत. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस यामुळे गंजून कमकुवत झाल्याची शक्यता आहे. अशा कुमकुवत झालेल्या होर्डिंगची आकाश चिन्ह विभागाने पाहणी करणे गरजेचे आहे अन्यथा घाटकोपरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्घटनेनंतर कारवाई करण्यापेक्षा दुर्घटना घडून नाही म्हणून उपाययोजना करणे आवश्यक आहे. अपघात झाल्यावरच प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार का अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटताना दिसून येत आहेत.