लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये कार लॉचींग करणे भोवले
सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार; वाहतूक शाखेकडून दोन हजारांचा दंड
पुणे : मारुती सुझुकी कंपनीच्या नवीन स्विफ्ट कारचे लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये कार लॉचींग करणे वाघोली येथील साई सर्विस शोरूमच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच अंगलट आले आहे. कारला समोर नंबर प्लेट नसल्याने वाहतूक शाखेने दोन हजारांचा दंड आकाराला. त्यामुळे कार लॉचींग करणे शोरूमच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे.
वाघोलीतील साई सर्विस शोरूमचे काही कर्मचारी नवीन स्विफ्ट कारच्या लॉचींगसाठी बुधवारी (दि. २२ मे) लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये कार घेवून गेले. परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, फोटो काढून कारचे लॉचींग करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर वाहतूक शाखेकडून दोन हजाराचा दंड आकारण्यात आला. पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांच्या कॅबीन समोर खाजगी वाहनाचे लॉचींग करणे पोलिसांना देखील महागात पडणार आहे. आधीच विना नंबर प्लेटच्या गाडीने दोघांना उडविल्याची कल्याणीनगरची घटना ताजी असताना लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी व पोलिसांच्या उपस्थितीत समोरून नंबर प्लेट नसलेल्या कारचे लॉचींग करण्यात आले. खासगी वाहन लॉचींग करण्यासाठी कंपनी व्यवस्थापकांनी पोलिसांना काही मानधन किंवा मौल्यवान वस्तू भेट देण्यात आली का? खासगी वाहन शासकीय कार्यालयात लॉचींग करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? याबाबत वरिष्ठांनी चौकशी करावी अशी मागणी भोरडे यांनी केली आहे. तसेच कार लॉचींग झालेल्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावी अशी मागणी सुद्धा भोरडे यांनी केली आहे. कार लॉचींग प्रकरण चांगलाच चर्चेचा विषय ठरला असून नागरिकांमधून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वरिष्ठ कार्यालयाने कार लॉचींग, सत्कार समारंभाबाबत कोणतेही आदेश दिले नसतील तर संबधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचेविरुद्ध नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ अन्वये कडक कारवाई करावी – अशोक भोरडे (सामाजिक कार्यकर्ते)
नवीन गाडी आल्यानंतर फीचर्स समजावून सांगायला सरकारी कार्यालय किंवा इतर ठिकाणी जात असतो. अशाच पद्धतीने पोलीस स्टेशनला गेलो. गाडी रस्त्यावर येण्यासाठीची परिवहन विभागाचा जो मापदंड आहे त्याचे सुद्धा पालक केले आहे. – अतुल खोड (मॅनेजर, मारुती सुझुकी शोरूम, वाघोली)
सर्वांसाठीच कायदा समान आहे. नंबर प्लेट दिसत नसल्याने महाराष्ट्र वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात आला आहे. – गजानन जाधव (सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोणीकंद)