विदेशी महागड्या स्कॉच विकणाऱ्यास अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय भरारी पथकाची कारवाई; ११ लाख ५४ हजार ५२५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
पुणे : वडगावशेरीतील ब्रम्हा सन सिटी जवळील एफ प्लाझा बिल्डींगच्या गाळ्यामध्ये छापा मारुन उच्च प्रतीच्या परदेशी बनावटीच्या आयात विदेशी मद्याच्या वेगवेगळया ब्रॅण्डच्या व क्षमतेच्या महागड्या स्कॉच विकणाऱ्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय भरारी पथकाने अटक केली आहे.
दिलीप हरद्वाणी (वय ३९ रा. वडगावशेरी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने दिलेल्या माहितीनुसार वडगांवशेरीतील ब्रम्हा सन सिटी जवळील एफ प्लाझा बिल्डींगच्या गाळ्यामध्ये उच्च प्रतीच्या परदेशी बनावटीच्या आयात विदेशी मद्याच्या वेगवेगळया ब्रॅण्डच्या व क्षमतेच्या महागड्या स्कॉचची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने छापा मारुन उच्च प्रतीच्या परदेशी बनावटीच्या आयात विदेशी मद्याच्या वेगवेगळया ब्रॅण्डच्या व क्षमतेच्या २६ सिलबंद बाटल्या तसेच एक होंडा कंपनीची अमेझ मॉडेलची चारचाकी कार, एक होंडा कंपनीची अॅक्टीव्हा दुचाकी वाहन व मोबाईल फोन असा एकूण ११ लाख ५४ हजार ५२५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये एका इसमाला अटक करण्यात आली असून गुन्हयातील इतर इसमांचा शोध सुरु आहे.
सदरील कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकासह राज्य उत्पादन शुल्क-अ विभाग कार्यालयाचे निरीक्षक वसंत कौसडीकर व त्यांचा पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक व्ही. एम. माने हे करीत आहेत.
पुणे शहरातील अवैध दारु निर्मीती, वाहतुक व विक्री व्यवसायाशी संबंधीत माहिती असल्यास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा.
– नरेंद्र थोरात (निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क)