दहिवडी पाझर तलावात पाणी सोडा
अॅड. शरद बांदल यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
शिरूर : शिरूर तालुक्यातील दहिवडी पाझर तलाव कोरडा पडला असून यावर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना भर उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दहिवडी तलावात तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी करडे येथील अॅड. शरद बांदल यांनी शिरूर तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावर्षी वाढत्या तापमानामुळे भूर्गाभातील पाण्याची पातळी घटली आहे. विहीर, कुपनलिका व परिसरातील पाणीसाठी कोरडे पडले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील करडे परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हातान्हात हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. दुग्धव्यवसायीकांना सुद्धा गुरांसाठी चारा मिळत नसल्याने त्यांच्या उपजीविका गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दहिवडी पाझर तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे तलावा परीसरातील करडे, आंबळे, दहिवडी, भांबर्डे, कळवंतवाडी, आनोसेवाडी, बाभूळसर खु. आदी गावात पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. चासकमानच्या धरणाच्या डाव्या कालव्यातून दहिवडी पाझर तलावात पाणी सोडल्यास परिसरातील गावातील नागरिकांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे दहिवडी पाझर तलावात तात्काळ पाणी सोडून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावावा ही अशी मागणी अॅड. शरद बांदल यांनी लेखी निवेदनाद्वारे शिरूर तहसीलदार यांचेकडे केली आहे.