बापूसाहेब कुंभार यांचा शिपाई ते कॅशिअर प्रेरणादायी प्रवास
कुंभार मित्र परिवाराच्या वतीने सेवापूर्ती सोहळा उत्साहात साजरा

वाघोली : वाघोली शाखेत कॅनरा बँकेमध्ये अविरत बेचाळीस वर्ष गौरवशाली सेवा बजवल्यानंतर निवृत्त झालेले बापूसाहेब किसन कुंभार यांचा सेवापूर्ती सोहळा रविवारी मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बापूसाहेब कुंभार वाघोली शाखेतील कॅनरा बँकेत तात्पुरते शिपाई म्हणून रुजू झाले होते. शिपाई ते कॅशिअर पदापर्यंत पोहचण्याचा कुंभार यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.
बँकेत साफसफाई करण्यापासून ते कॅशियर पदापर्यंत पोहचणाऱ्या एका साधारण कर्मचाऱ्याच्या अथक प्रयत्नांनी आणि दृढ संकल्पाने मोठ्या पदावर कसे पोहचता येते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कुंभार हे आहेत.
प्रारंभिक काळात तात्पुरती शिपाई म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शारीरिक आणि बँकिंगच्या विविध कामांमध्ये निपुणता प्राप्त केली. प्रामाणिकपणा, समर्पण आणि कामाची गुणवत्ता लक्षात घेऊन बँकेच्या उच्चाधिकार्यांनी त्यांच्या मेहनतीची दखल घेतली. शिपाई पदावर असतानाच विशेष प्रयत्न करून बँकिंग क्षेत्रातील अभ्यास अवगत केला. बँकेच्या अंतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांत भाग घेतला आणि बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाने त्यांनी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त केले. ज्यामुळे त्यांना पुढील पदोन्नती मिळवणे शक्य झाले.
कठोर परिश्रम व प्रामाणिकपणामुळे त्यांना बँकेने क्लार्क पदावर पदोन्नती दिली. क्लार्क पदावर पदोन्नती झाल्यानंतर नोंदी ठेवणे आणि ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करणे यासारखी महत्वाची कामे केली. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे त्यांना कॅशियर पदावर बढती मिळाली. कॅशिअर पदावर रुजू झाल्यानंतर अत्यंत जबाबदारीने काम केले. आर्थिक व्यवहार, रोख रक्कम हाताळणे, ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे आणि बँकेच्या नियमांचे पालन करणे या सारखी कामे कुशलतेने पार पाडली. त्याचबरोबर बँक डिपॉझिट व कर्ज वसुलीमध्ये ऑल इंडियामध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बँकेच्या वतीने त्यांचा सन्मानही करण्यात आला होता.
शिक्षण कमी असले तरी शिकण्याची जिद्द असल्याने डॉक्टर असलेल्या आपल्या मुलाकडून संगणीकरणासह बँकिंग संबंधी बाबींचे ज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग बँकेतील कामकाजासाठी केला. खरोखरंच त्यांचे कार्य बँकसह सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आदर्श ठरणारे आहे.
कॅनरा बँकमध्ये सात वर्षे तात्पुरती तर ३५ वर्ष कायमस्वरूपी अशी एकूण ४२ वर्ष बँकेत उत्कृष्ट सेवा करून बँक अधिकाऱ्यांसह ग्राहकांची मने जिंकली. ४२ वर्ष सेवा बजावल्यानंतर बापूसाहेब कुंभार निवृत्त झाले.
कुंभार यांचे वि.शे. सातव हायस्कूल १९८३ बॅच १० वी व बीजेएस महाविद्यालयाचे मित्र परिवार व कुटुंबियांच्या वतीने रविवारी (३० जून) मोठ्या उत्साहात सेवापूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी मित्र परिवार व विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कुंभार यांच्या पत्नी संगीता कुंभार, वि. शे.सातव हायस्कूल १९८३ बॅच १० वी व बीजेएस कॉलेजमधील मित्र परिवारासह इतिहास विभाग प्रमुख भूषण फडतरे, गिरीष शहा, शाम पाटील, मनोज कांकरिया, उदयसिंह कलेकर, विकास सातव, देवानंद दुधात, नितीन पाटील, किरण वाघमारे, अशोक शेजुळकर, गणेश कुंभार, डॉ. विजय कुंभार, डॉ. निलम कुंभार आणि परिवार उपस्थित होते.