video : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हातात कोयते घेऊन पसरवली दहशत
दहशत माजवणारा व्हिडीओ समाज माध्यमात झाला व्हायरल
पुणे : लोहगाव जवळील अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठात दोन दिवसांपूर्वीच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये एकमेकाकडे बघण्यावरून वाद झाला होता. या वादावरून चार जणांनी हातात कोयता घेऊन विद्यापीठ कॅम्पस परिसरात दहशत माजवली. हातात कोयते घेऊन दहशत माजवणारा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर या गंभीर प्रकरणाची नोंद दिघी पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार लोहगाव जवळील चऱ्होली हद्दीत असणाऱ्या अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठात दोन दिवसांपूर्वीच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये एक मेकाकडे बघण्यावरून शाब्दिक वाद झाला होता. विद्यापीठ प्रशासनाने दोन्ही बाजूच्या मुलांना समजावून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र (बुधवार दि. ८ मे) रोजी सायंकाळी विद्यापीठाची दोन विद्यार्थी अन् विद्यापीठा बाहेरील दोन मुलांनी हातात कोयता घेउन विद्यापीठाच्या आवारात दहशत माजवली. या प्रकारामुळे इतर विद्यार्थी भितीने पळत होते. सुरवातीला पोलीसांनी परस्पर विरोधी तक्रारी घेतल्या होत्या. आज (दि.९) रोजी हातात कोयते घेउन दहशत माजवणारा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने पोलीसांनी कलमामध्ये वाढ करून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कोणी जखमी झाले नाही. एकमेकात झटापट झाली आहे. तरुण मुले इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून सीसीटीव्ही फुटेज तपासून गैरप्रकार करणाऱ्याना ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ढमाळ यांनी दिली.