Video : मालकास बोलण्यात गुंतवून वीस लाखांचे दागिने चोरले
सोन्याच्या दुकानात चोरी करणारे सीसीटिव्हीमध्ये कैद्य
येरवडा : चांदीची मूर्ती घेण्याच्या बहाण्याने मालकाला बोलण्यात गुंतवून ठेवत सहकाऱ्याने ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचे सोन्याचे दागिने पळविली असल्याची घटना येरवडा बाजार येथील महावीर ज्वेलर्स मध्ये घडली आहे. याप्रकरणी राकेश गोपीलाल जैन रा. नीता पार्क कॉपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, विमानतळ रस्ता, येरवडा यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात सहा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ८) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महावीर ज्वेलर्स येरवडा बाजार येथे घडली आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी राकेश जैन हे महावीर ज्वेलर्सचे मालक आहेत. फिर्यादी राकेश जैन हे सकाळी ११ वाजता दुकानात एकटे असतांना ६ चोरट्यांचे टोळके महावीर ज्वेलर्स मध्ये सोने खरेदीच्या बहाण्याने घुसले. यातील एकाने मुलीसाठी अंगठी पाहिजे असल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादी जैन यांनी अंगठी दाखवली असता त्याने ती बघून परत केली. त्यानंतर टोळक्यातील दुसऱ्याने चांदीची मूर्ती पाहिजे असल्याचे फिर्यादी जैन यांना सांगितले.
यामुळे जैन काऊंटरवरून उठून बाजूला असलेल्या शोकेस मधील मूर्ती दाखवायला गेले. चोरट्यांनी मूर्ती पाहिल्या पण ते काही घेतल्या नाही. या दरम्यान जैन यांना बोलण्यात गुंतवून ठेवत इतर चोरट्याने काउंटरच्या खालच्या ड्रावरमध्ये ठेवलेल्या पॅकेट मधील सोन्याची चैन, मंगळसूत्र, मणी, मंगळसूत्रातील वाटी, सोन्याच्या ९ अंगठ्या, असा १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.