एमआयएमच्या एकमेव माजी नगरसेविका लांडगे काँगेसमध्ये
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये केला प्रवेश

पुणे : येरवडा येथील एमआयएम पक्षाच्या माजी नगरसेविका अश्विनी लांडगे व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
शहारातील पक्षाच्या एकमेव नगरसेविका असताना एमआयएम पक्षाने पुणे लोकसभेचा उमेदवार देताना आपल्याला विचारता न घेता उमेदवार दिला असल्याने नाराजी व्यक्त केली. याशिवाय काँगेस पक्ष हा सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याने आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी सांगितले.
२०१७ ला झालेल्या पुणे महानगर पालिका निवडणुकीत सुमारे पावणे दहा हजार मतदान घेऊन लांडगे या विजयी झाल्या होत्या. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये येरवडा मधून तीन शिवसेना व एक एमआयएमचा उमेदवार विजयी झाला होता. पुणे शहरात एमआयएम पक्षाच्या एकमेव नगरसेविका होत्या. त्यांच्या काँग्रेस प्रवेशा वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.