जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक
विश्रांतवाडी पोलीसांची कामगिरी; जोडप्याला अडवून मारहाण करत पळवली होती दुचाकी
![](https://deccanbulletin.in/wp-content/uploads/2024/05/08-05-2024-vishrantwadi-ps-780x470.jpg)
विश्रांतवाडी : यामाह दुचाकीवरून जाणाऱ्या जोडप्याला अडवून मारहाण करत गाडी चोरणाऱ्या तिघांना विश्रांतवाडी पोलीसांनी अटक केली. त्यांचेकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
खंडेश्वर रामहरी दापकर (वय २१ रा. उंड्री, ता. धारुर, जि. बीड), प्रशांत शिवाजी जंगम (वय २२ वर्षे, रा. नालवंडी, ता. जि. मणी), अक्षय संतोष जंगम (वय २१ वर्षे रा. तांबवा, ता. केज. जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामाह दुचाकीवरून जाणाऱ्या जोडप्याला अज्ञात तीन इसमांनी धानोरीतील आंबेडकर शाळेजवळील मोकळ्या जागेत अडवून मारहाण करत साठ हजार रुपये किमतीची गाडी चोरून नेल्याची घटना दिनांक १२ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी तपास करत असताना पोलीस हवालदार दिपक चव्हाण, शिपाई संदिप देवकाते यांना बातमीदाराकडून दोन आरोपी हे कटकेवाडी वाघोली येथे टीएसी कंपनीत हमालीचे काम करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाले. त्यानुसार पोलीस तपास पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सदर ठिकाणी जावून दोन आरोपींना ताब्यात घेऊन यामाहा कंपनीची आर-१५ मॉडेलची दुचाकी जप्त केली. तर तिसऱ्या आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक करण्यात आली.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, निरिक्षक मोहन खांदारे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार दिपक चव्हाण, बबन वणवे, यशवंत किर्वे, संपत भोसले, संजय बादरे, संदिप देवकाते, किशोर भुसारे, अक्षय चपटे यांचे पथकाने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.