वाघोलीतील पोदार स्कूलमध्ये पालकांचे ठीय्या आंदोलन
महिला पालकांनी स्कूल प्रशासनाला धरले धारेवर; सामाजिक कार्यकर्त्या सीमा गुट्टे यांच्या आक्रमक भूमिकेपुढे स्कूल प्रशासन झुकले

वाघोली : वाघोली येथील चोखीदानी रोडवर असणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील अकाऊंटन्ट याने काही महिन्यांपूर्वी पालकांकडून स्वतःच्या खात्यात परस्पर शुल्क घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी त्याचेवर लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. परंतु पालकांनी शुल्क भरून देखील स्कूल प्रशासनाच्या वतीने पुन्हा शुल्क भरण्याचा तगादा लावला. अखेर संतप्त पालकांनी सामाजिक कार्यकर्त्या सीमा गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली शाळेत दोन ते अडीच तास ठिय्या आंदोलन करून शाळा प्रशासनाला धारेवर धरले. आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पालक व शाळा प्रशासन यांचेमध्ये हस्तक्षेप करून तोडगा काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विनय भेडकर हा लेखापाल म्हणून काम पाहत होता. पालकांकडून शुल्क व रोख रक्कम स्वतःच्या खात्यात घेवून फरार झाला. त्यानंतर स्कूलने त्याचे विरोधात लोणीकंद पोलिसांत तक्रार दाखल केली. फीस जमा करून देखील शाळेकडून शुल्कसाठी तगादा लावला जात आहे. पालकांनी शाळा प्रशासनाला वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र स्कूल प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने पालकांनी सामाजिक कार्यकर्त्या सीमा गुट्टे यांचेकडे धाव घेतली. त्यांतर सोमवारी (दि. ८ एप्रिल) सीमा गुट्टे यांचेसह पालक शाळेमध्ये येऊन स्कूल प्रशासनाला शुल्क बाबत विचारणा केली. दरम्यान स्कूल प्रशासनाकडून महिला पालकांना असभ्य भाषा वापरत उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने संतप्त पालकांनी ‘जो निर्णय घ्यायचा आताच घ्यावा’ अशी टोकाची भूमिका घेत ठिय्या आंदोलन सुरु केले. सामाजिक कार्यकर्त्या सीमा गुट्टे यांच्यासह पालक प्रचंड आक्रमक झाल्याने स्कूल प्रशासनाने नमती भूमिका घेत मार्ग काढू असे आश्वासन दिले. आंदोलनाची पोलिसांना माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले व पोलीस कर्मचारी शाळेमध्ये दाखल झाले. स्कूल प्रशासन व पालकांशी पोलिसांनी चर्चा केली. फसवणूक झालेल्या जवळपास ७० पालकांचे जबाब पोलीस लिहून घेणार आहेत. पालकांना माहिती हवी असल्यास कार्यालयात येऊ दिले जात नाही, स्कूल प्रशासनाशी बोलू देत नाहीत, पालकांशी असभ्य वर्तन केले जाते, मुलांचे रिपोर्ट कार्ड देण्यास नकार आदी तक्रारी पालकांनी केल्या आहेत.
फसवणूक करणारा हा स्कूलचा लेखापाल होता. त्यामुळे आम्ही त्याचेवर विश्वास ठेवून त्याचेकडे शुल्क जमा केली
-एक महिला पालक
पालकांची अडचण समजवून घेवून स्कूल व्यवस्थापनाला माहिती देण्यात येईल. याबाबत योग्य स्कूल व्यवस्थान योग्य निर्णय घेतील. पालकांच्या मुलांना शाळेत येण्यास अडविलेले नाही.
– स्कूल प्रशासन (पोदार इंटरनॅशनल स्कूल)
पोदार इंटरनॅशनल स्कूल अतिशय दर्जेदार स्कूल म्हणून गवगवा केला जात आहे. मात्र त्यांच्या सिस्टममध्ये अनेक त्रुटी आहेत. विद्यार्थ्यांची, पालकांची फसवणूक केली जात असून पालकांसोबत पारदर्शकतेचा अभाव आहे.
– सीमा गुट्टे (सामाजिक कार्यकर्त्या, वाघोली)
सीमाताई गुट्टे (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस), विवेक वाडेकर (युवासेना उद्धव ठाकरे), प्रवीण सोमवंशी (युवक काँग्रेस सरचिटणीस), क्षमा चोरडिया, माधुरी वारे, अपर्णा शिर्के, सचिन ढमढेरे, पद्मजा किल्लेदार, रमा आठवले, छाया मांडले, सविता पवार, सविता जाधव आदी महिला आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.