सिकंदरने खराडीचे मैदान गाजवले
७५ जंगी कुस्त्या उत्साहात संपन्न
पुणे : श्री काळ भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त खराडी येथे कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. अकरा हजारा पासून ते ३ लाख ५१ हजार रुपया पर्यंतच्या एकूण ७५ कुस्त्या झाल्या. प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी व हिंदकेसरी प्रिन्स कोहली (पंजाब) यांच्यामध्ये झाली. सिकंदर शेख मोळी डाव टाकत असताना प्रिन्स कोहली जखमी झाल्याने शेख यास विजय घोषित करण्यात आले. द्वितीय क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व पंजाब केसरी गौरव मच्छवारा यामध्ये झाली. यामध्ये महेंद्रने पोकळ घिस्सा डावावर विजय मिळवला. तृतीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन माऊली कोकाटे विरुद्ध अमिन बिनिया यामध्ये झाली. सदर कुस्ती बरोबरीत सुटली. इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या आखाड्याचे उदघाटन माजी आमदार जगदीश मुळीक, आळंदी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र उमाप, सुहास टिंगरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते झाले.
चतुर्थ क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज पाटील विरुद्ध विशाल भोंदू यांच्यात बरोबरी सुटली. पाचव्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र चॅम्पियन व मध्यप्रदेश केसरी गौरव इंदोर या दोघांमध्ये झाली. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ घुटना डावावर विजयी झाला. सहाव्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन दादा शेळके व राष्ट्रीय विजेता युधष्ठिर यामध्ये झाली. त्या मध्ये दादा शेळके इराणी एक लंगी डावावर विजयी झाला.
अतिशय प्रेक्षणीय कुस्त्यांमध्ये बाळू बोडके यांनी हनुमंत पुरीस चारी मुंड्या चीत केले. जयदीप पाटील याची पै. सोनू वर एकचाक डावावर विजयी झाला. कालीचरण सोलनकरची आर्मीच्या गोपाळ कोळी वर घुटना डावावर प्रेक्षणीय विजय सदर केला. आखाड्यासाठी महाराष्ट्रातून अलोट गर्दी झाली. त्यामध्ये प्रामुख्याने हिंदकेसरी दीनानाथ सिंह, डीवायएसपी अर्जुन वीर राहुल आवारे, अर्जुन वीर काका पवार यासह महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी विजेते पैलवान उपस्थित होते.
राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राम सारंग, रणजीत नलावडे, रघुनाथ पवार, आशिया सुवर्ण रवी पाटील, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, रावसाहेब मगर, आप्पासाहेब कदम, आणि महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी वस्ताद कुस्ती संघटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना रोख इनाम देऊन युवा नेते सुरेंद्र पठारे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. पैलवान मंडळीसाठी स्नेहभोजन भोजन व्यवस्था अण्णासाहेब पठारे व बापुसाहेब पठारे यांनी केली होती. सदर आखाड्यामध्ये ४० लाख रुपये कुस्त्त्यांची रोख इनाम वाटप करण्यात आल्याची माहिती आखाडा प्रमुख माजी नगरसेवक महादेव पठारे पाटील यांनी दिली.
माजी नगरसेवक महेंद्र पठारे, बबन तात्या पठारे पाटील, गुलाब पठारे, विलास कंडरे, दिलीप पठारे पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष राहुल पठारे, उद्योजक कैलास पठारे, बाळासाहेब राजगुरू, बापू वसंत पठारे, नवनाथ पठारे, रवींद्र पठारे, स्वप्निल पठारे, शरद पठारे, प्रकाश पठारे, संतोष बापू पठारे, सचिन पठारे, पप्पू गरुड आदि मान्यवर उपस्थित होते.