मुरलीधर मोहोळ व मा. आमदार जगदीश मुळीक यांची गळाभेट
भाजपचे उमेदवार मोहोळ यांच्या प्रचारासाठी मुळीक होणार सक्रिय

पुणे : पुणे लोकसभेची भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ व माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यात चुरस होती. अखेर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर मुळीक समर्थक, कार्यकर्ते नाराज झाले होते. शनिवारी भाजपा उमेदवार मोहोळ यांनी मुळीक यांच्या निवास स्थानी जाऊन मुळीक यांची सदिच्छा भेट घेतली. मुळीक आणि मोहोळ यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. उमेदवारी वरून सुरू असलेली कटुता कमी झाली. मुळीक कुटुंबियांकडून औक्षण आणि पुष्पगुच्छ देऊन उमेदवार मोहोळ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लोकसभा निवडणुकीसह विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली.
लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये घेवून दुसऱ्या दिवशी मोहोळ यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये माजी आमदार जगदीश मुळीक हे अनुपस्थित होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. भाजपमध्ये कोणतीही नाराजी नसून मुळीक देखील आपल्या प्रचारामध्ये सहभागी होऊन मदत करतील असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला होता. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुळीक यांनी सोशल मीडियावर नागरिकांच्या आभाराची पोस्ट टाकत सहानुभूती मिळवली होती. त्यामध्ये नाराज असल्याचा उल्लेख त्यांनी केला नसला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सुरु उमटला होता. शनिवारी मोहोळ यांनी गळाभेट घेतल्याने मुळीक नक्कीच काही दिवसात प्रचारात सक्रिय होतील अशी शक्यता आहे.