Video : यापुढे गुन्हेगारी केल्यास टायर दाखवू – अजित पवार
विश्रांतवाडी : विश्रांतवाडीत सापडलेल्या ड्रग्जचे धागेदोरे लंडनपर्यंत पोहोचले. अल्पवयीन मुले कोयता गँगमध्ये सहभागी असल्याचे चित्र आहे. गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले असून त्यामुळे आपली ‘कार्टी’ व्यवस्थित सांभाळा. त्यांना शिस्त लावली नाही तर आम्ही त्यांच्या आई-वडिलांना जबाबदार धरून कारवाई करू. कितीही मोठ्या बापाचा पोरगा असेल तरीही कारवाई होणारच असा सज्जड दम उपमुख्य मंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला. पुणे महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने विश्रांतवाडी चौकात ग्रेड सेपरेटर, उड्डाण पुलासह आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नातून वडगांवशेरी मतदार संघासाठी १७२ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते विश्रांतवाडी येथे करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार सुनील टिंगरे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे, माजी नगरसेविका शीतल सावंत, मीनल सरवदे, सतीश म्हस्के, राजेंद्र खांदवे, सुहास टिंगरे, रवी टिंगरे, अजय सावंत, अशोकबापू खांदवे, बंडू खांदवे आदि उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, पुण्यात १२-१४ वर्षाची मुले हातात हत्यारे घेऊन सर्रास फिरतात. यामध्ये काही अल्पवयीन बालके असल्याने कायदेशीर कारवाईला अडचणी येत आहेत. यापुढे हे चालणार नाही. आपली मुले कुणाबरोबर राहतात, काय करतात याच्याकडे आई-वडिलांचे लक्ष पाहिजे. यापुढील काळात आम्ही कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत. पुण्यात ड्रगचे मोठे रॅकेट सापडले. ज्याची पाळेमुळे देशात आणि परदेशापर्यंत पोहचली आहेत. यापुढे कोणालाही सवलत मिळणार नाही. आम्ही कोणालाही पदरात घेणार नाही. आता आमचा पदर फाटला आहे. आता पदर नाही की धोतर नाही. आता थेट टायर दाखवला जाईल, अशा अनोख्या खुमासदार शैलीत अजित पवार यांनी त्यांच्या खास भाषेत उदयोगी मुलांना आणि त्यांच्या पालकांना चांगलाच दम दिला. झटपट श्रीमंत होण्यासाठी ड्रग्ज सारखे भयंकर रॅकेट चालवले जाते. त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. पुणे शहराचे नावलौकिक खराब होत आहे. या पुढील काळात काहीही खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे सगळ्यांनीच आता काळजी घेतली पाहिजे. अन्यथा अशा लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पवार यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार चांगले काम करत असून सगळे प्रकल्प गुजरातला नेले या केवळ अफवा असल्याचे पवार यांनी सांगीतले. रिंगरोडची कामे प्रगती पथावर आहेत. त्यामुळे पुण्यातील बरीच वाहतूक कमी होईल. येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागेल त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत एनडीएला साथ द्या असे आवाहन पवार यांनी केले.
आमदार सुनील टिंगरे म्हणाले, वडगावशेरी मतदार संघासाठी मागील काळात इतका कोणीही निधी आणला नाही तो आपण आणला आहे. अजित पवार यांची सावली म्हणून कायम साथ देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रस्ताविकात महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पुलामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. येत्या दोन वर्षात हा प्रोजेक्ट पूर्ण होणार असून यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, पुणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे.
आमदार सुनिल टिंगरे, राजेंद्र खांदवे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन डॉ. राजेश साठे यांनी केले.