वाघोली येथे शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न
ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशनमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शालेय साहित्यांचे वाटप
वाघोली : ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशनच्या वतीने वाघेश्वर पॅलेस, नगररोड वाघोली येथे शिरूर व हवेली विधानसभा गटातील १० वी व १२ वी च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ, करिअर मार्गदर्शन मेळावा, शालेय साहित्य वाटप तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे लाडके गुरुजी प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी मार्गदर्शन केले.
दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब आणि तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईल फोन बक्षीस म्हणून देण्यात आला. उर्वरित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच देण्यात आले. यासोबतच मेळाव्यादरम्यान सामाजिक जबाबदारी म्हणून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप देखील करण्यात आले.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना घडविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा असतो अशा गुरुजनांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशनच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उज्वल कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करत त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर माऊली (आबा) कटके यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. विविध उपक्रम राबवून विद्यार्थी आणि शिक्षकांना उभारी देण्याचे काम यापुढेही करण्यासाठी कटिबध्द असल्याचे मत कटके मांडले व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. या कार्यक्रमात मोठ्यासंख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक, परिसरातील ज्येष्ठ मंडळी व नागरिक उपस्थित होते.











