Video: कार चालकाने श्वानाला चिरडले
प्राणी प्रेमीची गुन्हा दाखल करण्याची मागणी; वाघोलीतील पंचशील टॉवर्सच्या गेट समोरील घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे : कार चालकाने बेदरकारपणे गाडी चालवीत श्वान चिरडल्याची घटना वाघोली येथे घडली आहे. याप्रकरणी एका श्वान प्रेमी नागरिकाने पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांकडे दिले आहे. ही घटना २० फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास पंचशील टॉवर्सच्या गेट क्रमांक चार समोर घडली.
श्वान प्रेमी आशीष गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचशील टॉवर्समध्ये प्रवेश करण्यापूर्वी या मोटारीने रस्त्यावर झोपलेल्या एका भटक्या श्वानाला चिरडले. त्यामुळे पंचशील टॉवर्सच्या बाहेर असलेल्या भटक्या श्वानाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे चित्रीकरण पंचशील टॉवर्सच्या गेट ४ वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आशीष गुप्ता यांनी पुणे पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांना लोणीकंद पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने बोलावले होते. गुप्ता यांनी पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज दिले असून त्यामध्ये सर्व घटना स्पष्टपणे दिसत आहे. प्रवेशद्वारावर नेमणुकीस असलेल्या सुरक्षा रक्षकांनी देखील ही घटना पाहिली आहे.
याबाबत तक्रारदार आशीष गुप्ता यांनी २२ फेब्रुवारी रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलिसांची भेट घेतली. मात्र, त्यांनी या घटनेची नोंद घेण्यास किंवा तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर, एका कर्मचाऱ्याने केलेल्या हस्तक्षेपामुळे गुप्ता यांना वाघोली चौकी येथे जाऊन भेटण्यास सांगण्यात आले. त्याठिकाणी असलेल्या एका अधिकाऱ्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी करण्यासाठी सोसायटीला भेट दिली. सुरक्षा कर्मचाऱ्यांशीही याबाबत चर्चा केली. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यावा याकरिता गुप्ता प्रयत्न करीत आहेत.
अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून यासंदर्भात तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे. सीसीटीव्ही तपासून तसेच वस्तुस्थिती तपासून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे लोणीकंद पोलिसांनी सांगितले.