राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाची हातभट्ट्यांवर कारवाई

१ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; सहा जणांना अटक  

पुणे : अगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्या पुणे विभागाच्या कार्यालयाने सोलापूर जिल्हयात अवैध दारु धंदया विरोधात धडक कारवाई केली. सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या कारवाईत पाऊणे दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने अवैध दारु निर्मीती, वाहतुक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने २८ व २९ फेब्रुवारी रोजी मोहिम राबवण्यात आली. यामध्ये सोलापूर जिल्हयातील टाकळी, कोर्टी, गादेगाव, शिवाजीनगर तांडा व कॉडी या ठिकाणी देशी, विदेशी मद्य विक्री तसेच अवैध गावठी हातभट्टी दारु निर्मीती व विक्रीच्या ठिकाणी दारुबंदी गुन्हयाअंतर्गत छापे मारण्यात आले. एकुण ६ वारस व १ बेवारस असे एकूण ७ गुन्हयांची नोंद करुन सदर गुन्हयामध्ये २४५ लिटर गावठी हातभट्टी दारु, ६९०० लिटर रसायन, देशी दारु १५ लिटर, विदेशी मद्य ११ लिटर तसेच गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचे साहीत्य असा एकुण अंदाजे १ लाख ७६ हजार ५३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयामध्ये ६ जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील व दुय्यम निरीक्षक व्हि. एम. माने हे करीत आहेत.

सदर कारवाई दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि. एम. माने, जवान ए. आर. थोरात, आर. टी. ताराळकर, पी. डी. पुसावळे, ए. आर. दळवी यांनी केली आहे.

यापुढे देखील अशाच प्रकारच्या मोहिमा आखून अवैध दारु व्यवसायांवर सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे.

– नरेंद्र थोरात (निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क)

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button