प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रो विमानतळापर्यंत जोडावी
आमदार सुनिल टिंगरेंची विधानसभेत मागणी

पुणे : पुणे शहरात मेट्रोचे जाळे उभे राहत आहे. मात्र पुणे विमानतळाला मेट्रोची लाईन जोडण्यात आलेली नाही. प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रो विमानतळापर्यंत नेण्यात यावी अशी मागणी वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत २९३ व्या ठराव्यावरील चर्चेत आमदार टिंगरे यांनी सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले, शहरात मेट्रोचे जाळे अतिशय मोठ्याप्रमाणात पसरत चालले असून त्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळतोय. मेट्रोशी शिवाजीनगर, पुणे स्टेशन रेल्वे स्टेशन, स्वारगेट एसटी स्टॅन्ड असे महत्वाचे भाग जोडले आहेत. परंतु शहरात विमानतळ आहे याचा विसर पडलेला दिसतो. नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत मेट्रो आलेली आहे. मात्र ती विमानतळाला जोडलेली नाही. त्यामुळे विमानतळावर ये-जा करणार्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. आपण परदेशात विमानतळापासून थेट मेट्रोची सुविधा पाहतो. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सोईसाठी पुणे विमानतळापर्यंत मेट्रो नेण्यात यावी अशी मागणी आमदार टिंगरे यांनी केली.
तसेच झोपडपट्टीतील रहिवाशांना हक्काची घरे देण्यासाठी राबविण्यात आलेल्या एसआरए योजनेत २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना घरे दिली जात आहेत. मात्र या योजनेच्या नियमावलीत सुधारणा करून २०२४ पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांचा समावेश करून त्यांना घरे देण्यात यावी. जेणेकरून कुटुंब वाढलेल्या झोपडपट्टीधारकांना त्याचा फायदा मिळू शकेल अशी मागणीही आमदार टिंगरे यांनी केली आहे.