वाघोली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांचेवर न्यायालयाचे कारवाईचे आदेश
जन्म-मृत्यू नोंदणी खाडाखोड प्रकरण भोवले
पुणे : वाघोली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी तथा निबंधक मधुकर दाते यांच्यावर जन्म-मृत्यू नोंदणी पुस्तकातील खाडाखोड प्रकरणी कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याची माहिती अॅड. नरेंद्र वाघमारे यांनी दिली.
तक्रारदाराच्या वकील नीलिमा जोशी यांनी युक्तिवाद केला की, निबंधक मधुकर दाते यांनी सन २०१८ मध्ये तक्रारदार स्वप्निल रोकडे यांना आजी विठाबाई वाघमारे यांच्या मृत्यूची नोंद उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र दिलेले असताना सन २०१९ मध्ये मृत्यूचा दाखला तयार झाल्याने, तक्रारदाराने नोंदणी पुस्तकात शोध घेतला असता विठाबाई अर्जुन वाघमारे या नावात खाडाखोड करून विठाबाई धर्माजी वाघमारे केल्याचे दिसून आले. त्याबाबत पोलीसांनी केलेल्या चौकशी अहवाल २०२ मध्ये सदर मृत्यू दाखला संगणकावरील नोंदीवरून दिला असा जबाब मधुकर दाते यांनी दिला असला तरी दि. २२/११/२२ रोजी जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाने दिलेल्या पत्रात नोंदीत खाडाखोड असल्याने सदरची नोंद संगणीकरण झाली नसल्याचे नमूद केले आहे. सदरची नोंद जन्म मृत्यू नोंदणी कायद्याचे उल्लंघन करणारी आहे व खोटी नोंद करणे लोकसेवकाच्या कार्यक्षेत्रात येत नाही म्हणून त्यांचे विरुद्ध गुन्ह्याची दखल घेण्यास मंजुरीची आवश्यकता नाही. सदर बाब ग्राह्य धरून निबंधक मधुकर दाते यांचा जबाब संशयास्पद असून रेकॉर्डमध्ये खाडाखोड असल्याने सरकारी रेकॉर्डमध्ये बनावटीकरण केल्याचा गुन्हा निष्पन्न होत असल्याने प्रथमवर्ग न्यायालयाने कारवाईचे आदेश दिलेले आहेत. सदर प्रकरणात तक्रारदारातर्फे अॅड. नीलिमा जोशी व अॅड. नरेंद्र वाघमारे यांनी काम पाहिले.