येरवड्यात अल्पवयीन टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड
वाहने फोडण्याचे सत्र थांबेना

येरवडा : येरवडा परीसरात दहशत माजविण्यासाठी रात्रीच्या वेळेस पार्किंग केलेल्या गाड्या फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. शनिवार (दि.१७) च्या मध्यरात्री भोरी चाळ, पांडू लमाण वस्ती येथे किरकोळ कारणावरून सहा अल्पवयीन मुलांनी धारदार लोखंडी शस्त्राच्या सह्याने आरडाओरड करत घरा समोर लावलेल्या पाच वाहनांची तोडफोड केली. यामध्ये रिक्षा, दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. जुगनू परदेशी (वय ४०, रा. पांडू लमाण वस्ती, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून तोडफोड करणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांना येरवडा पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे यांनी दिली.
उपनिरीक्षक सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन संशयीत आरोपी मधील एकाला मारहाण झाली होती. त्या रागातून सहा जणांनी शनिवारच्या मध्यरात्री दीड च्या सुमारास लोंखडी हत्याराने व दगडांनी फिर्यादी यांचे घरासमोर पार्क केलेल्या रिक्षा व दुचाकी वाहनांची आरडाओरड करत तोडफोड केली. टोळक्याने लोंखडी हत्यार फिरवुन वस्ती मध्ये दहशत केली. अधिक तपास उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे करत आहेत.