कारागृह राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात
येरवडा : महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांच्या करिता राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र कारागृह विभागाचे एकूण पाच विभाग असून विभागीय स्तरावरून विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये ज्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अथवा विजेते आहेत अशा खेळाडूंकरीता दरवर्षी मुख्यालय स्तरावरून वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येरवडा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
क्रीडा स्पर्धामध्ये ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये पुरूष व महिला खेळाडूंनी १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, रिले, थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक, लांबउडी, कराटे, कुस्ती, बॅडमिंटन एकेरी, रिंगटेनिस एकेरी हे वैयक्तिक खेळ तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सी खेच या सांघिक क्रीडा प्रकारात पुरूष व महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पाच दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
वार्षिक क्रीडा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
महाराष्ट्र कारागृह राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाने सन २०२३-२४ या वर्षाचे विजेतेपद पटकावले. सर्वोत्कृष्ट पुरूष खेळाडू म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे सुनिल विठ्ठल काकरवाल तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून नाशिक विभागाच्या अनिता कैलास वाकचौरे यांची निवड करण्यात आली असून विजेत्यांना ट्रॉफी व रोख २१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
बक्षिस वितरण कार्यक्रमाकरिता कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, यु. टी. पवार, प्राचार्य नितीन वायचळ, येरवडा जेलचे अधिक्षक सुनिल ढमाळ तसेच इतर मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांचे अधीक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच खेळाडू उपस्थित होते.