चिमुकल्यांच्या नृत्यांनी जिंकली उपस्थितांची मने
गोरेगाव जि.प. केंद्रीय प्रा. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

गोरेगाव : सेनगाव (जि. हिंगोली) तालुक्यातील गोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
गोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत बुधवारी (दि १४ फेब्रुवारी) बालचिमुकल्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहसंमेलनामध्ये चिमुकल्यांनी विविध वेशभूषा साकारून करून शिवनेरी वर शिवबा जन्मला, साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, पाटलांचा बैल गाडा, भिमाची लेखणी, मेली मेली हो माझी सख्खी बायको मेली, सोन्याचा झुमका आदी लोकगीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता पहिली ते चौथीतील बाल चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उदघाटक गोरेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार रविंद्र हुंडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत पाटील, मुख्याध्यापक डी ई पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सय्यद सलिम सय्यद लाल, विठ्ठल राजे खिल्लारी, वर्धमान साळवे, स्वाती भिसे, संगिता खिल्लारी, उषाताई धामणकर, आयेशा बी जब्वार, अर्चना ढाकरे यांची उपस्थिती होती. स्नेहसंमेलन यशस्वी करणेसाठी शिक्षक सुरेश हनवते, शिक्षक रामचंद्र वैरागड, सुनील खिल्लारी, प्रमोद बिल्लारी, रमेश पोफळे, नंदकुमार खिल्लारी, घनकर, पोपुलवार, पतंगे, काळे यांनी विषेश परिश्रम घेतले.