एकाच दिवशी महामार्गावर बंद पडली ५ वाहने
लोणीकंद वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने वाहतूक केली सुरळीत

पुणे : पुणे-नगर महामार्गावर दररोजच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असताना शनिवारी एकाच दिवशी पाच मोठ्या गाड्या बंद पडल्या. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वेळेवर क्रेन आणणे शक्य नसल्याने वाहतूक पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने नागरिकांच्या सहकार्याने पाचही गाड्या ढकलून रस्त्याच्या बाजूला घेवून वाहतूक सुरळीत केली.
पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथे नागरिकांना वाहतूक कोंडीचा दररोजचा सामना करावा लागत आहे. त्यातच एखादे वाहन जरी बंद पडले तर प्रचंड वाहतूक कोंडी होते. शनिवारी (दि. १० फेब्रुवारी) इतर दिवशीपेक्षा महामार्गावर वाहतुकीचा ओघ खुप जास्त असतो त्यातच मिक्सर, पाण्याचे टॅंकर, ट्रक, टिपर व ट्रॅव्हल्स अशी ५ मोठी वाहने बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलीस कोंडीमुळे हतबल झाले होते. बंद पडलेली वाहने कशी काढायची असा प्रश्न त्यांचेपुढे उभा राहिला होता. तात्काळ क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूल घेणे शक्य नव्हते. परंतु लोणीकंद वाहतूक शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने बंद पडलेली वाहने रस्त्याच्या बाजूला घेवून वाहतूक सुरळीत केली.