पाच वर्षाची मुलगी वडिलांच्या स्वाधीन
वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
वाघोली : वाघोलीतील केसनंद फाटा येथून बसने गावी निघालेल्या बाप लेकीची ताटातूट झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तात्काळ वडिलांचा शोध घेऊन पुन्हा गळाभेट घडवून आणली. दैनदिन कर्तव्य पार पाडत असताना पाच वर्षाच्या मुलीची वडिलांसोबत गळाभेट घडवून आणत असताना छोट्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद पोलीसांना एक वेगळी उर्जा देवुन गेला. मुलगी ताब्यात मिळताच वडिलांनी वाहतूक पोलिसांचे मनापासून आभार मानले.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी (दि. १२) सायंकाळी लोणीकंद वाहतुक विभागाचे कर्मचारी स्वप्निल गालफाडे व सागर चौधरी हे केसनंद फाटा येथे वाहतुक नियमन करीत असताना एक पाच वर्षाची लहान मुलगी भर चौकात पायी रडत जात असताना पाहीले. मुलीला ताब्यात घेवुन महिला कर्मचारी स्नेहल टकले यांनी तिचे रडणे थांबविले. काळजीपूर्वक विचारपुस केल्यावर तिने तिचे नाव सांगून तिचे वडील मिळून येत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ केसनंद फाटा परीसरात पायी फिरून तिच्या वडिलांचा शोध घेतला. योग्य ती विचारपुस करून मुलीस वडीलांच्या ताब्यात देण्यात आले.
गावी जात असताना पुढील भागात स्वस्त तिकीट मिळत असल्याने वडिल मुलीला एका जागेवर बसवून तिकीट काढण्यासाठी गेले होते. थोड्यावेळाने मुलीला वडील दिसत नसल्याने ती बावरली व वडिलांचा शोध घेत पायी फिरू लागली. वडील मिळत नसल्याने ती रडू लागली आणि केसनंद फाटा येथे पोलिसांना मिळाली.