वाघोली येथे पुणे-नगर रोड जलमय
रामभाऊ दाभाडे यांच्या पुढाकाराने सुटला प्रश्न; नागरिकांसह वाहनधारकांना दिलासा

वाघोली : शनिवारी सकाळी झालेल्या पावसामुळे वाघोली येथे कावेरी हॉटेलजवळ पुणे-नगर महामार्गाला पुराचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी तातडीने संबंधित मनपा विभागाशी संपर्क साधून साचलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याने नागरिकांसह वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
शनिवारी (दि. ७ जून) सकाळी झालेल्या पावसामुळे वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावरील कावेरी हॉटेलजवळ प्रचंड पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने वाहतुकीचा वेग कमी झाला होता. तसेच अपघातांची शक्यता निर्माण झाली होती. रामभाऊ दाभाडे यांनी समस्येची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाच्या सहकार्याने जलदगतीने पाण्याचा उपसा केल्याने वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली.
नागरिकांनी रामभाऊ दाभाडे यांच्या त्वरित कृतीबद्दल समाधान व्यक्त केले. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.