बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी
कोलवडी येथील घटना; लोणीकंद पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल
वाघोली : कोलवडी येथील गट नंबर ११५५ मध्ये जमिनीच्या वादातून बंदुकीचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी परस्परविरोधी लोणीकंद पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट व इतर कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना गुरुवारी (दि.१) सायंकाळी उशिरा ७ च्या सुमारास घडली.
याप्रकरणी चंद्रकांत कुंजीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अविनाश बापूसाहेब सातव, तुषार राजाराम म्हस्के, योगेश अशोक शिंत्रे, नवनाथ तुकाराम घुले, एकनाथ पिराजी उंद्रे, आव्हाळे (पुर्ण नाव माहित नाही) व एक अनोखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर योगेश शिंत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चंद्रकांत महादेव कुंजीर, तीन अनोळखी पुरुष व तीन अनोळखी महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंजीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि, फिर्यादी कुंजीर यांचे मालकी हक्काची कोलवडी येथील शेतामध्ये कुंजीर हे त्यांची पत्नी, आई, पुतण्या, वाहिनी, व इतर यांचेसह हुरडा खाण्यासाठी थांबलेले असताना आरोपीत यांनी येऊन फिर्यादी यांना वाईट वाईट शिवीगाळ करण्यास सुरुवात करून तुम्ही या जागेतून सगळे बाहेर व्हा नाहीतर या ठिकाणी रक्त सांडेल असे म्हणून योगेश शिंत्रे यांनी त्यांच्याकडील बंदूक काढून फिर्यादीवर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली व इतर आरोपीतांनी फिर्यादीवर त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांचे अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करून शिवीगाळ केले.
शिंत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि, आरोपीत चंद्रकांत कुंजीर यांनी फिर्यादी यांना त्यांचे मालकीचे जागेमधून बाहेर जाण्यास सांगून बाहेर गेला नाही तर जीवे मारीन अशी धमकी दिली तसेच दोन अनोळखी पुरुषांपैकी एका अनोळखी पुरुषांने त्याचे जवळ असलेल्या बंदुकीचा धाक दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिली तसेच तीन अनोळखी महिला व एक अनोखी पुरुष यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून दंगा करून फिर्यादीचे मालकीचे क्षेत्रांमध्ये बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून जागेमध्ये परत यायचे नाही असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन बंदुकीचा धाक दाखवून शिवीगाळ दमदाटी केली.