भरधाव वेगाने कार चालवत तरूणीला फरफटत नेले ; तरूणीचा मृत्यू
खराडीतील आयटी पार्क समोरील अपघात

चंदननगर : भरधाव वेगाने कार चालवून समोरील दुचाकी वरील तरुणीला धडक देत फरफटत नेल्याने तिचा मृत्यु झाला. हा अपघात खराडीतील झेनसार आयटी पार्क समोर शुक्रवार (दि.१५) रोजी दुपारी घडला. अपघातात सोनाली अविनाश रोकडे (वय-२६ वर्षे) असे मृत तरुणीचे नाव आहे. अभिषेक गायकवाड, (वय-२९ वर्षे, रा.स.नं.४७, सुनितानगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गायकवाड हे चहा पिऊन त्यांच्या नातेवाईक सोनाली रोकडे हिला तिच्या पी.जी. रूमवर सोडवण्यासाठी मोपेडवर घेवुन जात असताना, कारवरील चालकाने त्याच्या ताब्यातील कार ही अविचाराने व हयगयीने वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन, भरधाव वेगात चालवुन, रस्त्याचे कडेला उभे असलेल्या ३ ते ४ वाहनांना धडकली. त्यानंतर गायकवाड यांच्या मोपेड गाडीला पाठीमागुन जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील सोनाली या खाली पडल्या. अशा अवस्थेत कार चालकाने त्यांना फरपटत नेले. यामध्ये सोनाली या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. कार चालकास पोलिसांनी अद्याप अटक केली नव्हती. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करत आहेत.