मैत्रीण बोलत नसल्याने तरुणाने केली आत्महत्या
येरवडा परिसरातील घटना

येरवडा : मैत्रीणीने बोलणे बंद केल्यामुळे मानसिक तणावातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा परीसरात आज (दि.५) रोजी घडली. मयत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर अल्पवयीन मैत्रीणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा येरवडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक दिपक जमदाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण आणि अल्पवयीन मुलगी हे मित्र-मैत्रीण होते. मात्र काही दिवसानंतर मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले. आपल्याशी बोलावे म्हणून तरुणाने अनेकदा प्रयत्न केले. शेवटी तरुणाने आजीच्या घरी येऊन मैत्रिणीशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांच्यात भांडण झाले. मैत्रीण काही केल्या बोलत नसल्याच्या मानसिक त्रासातून तरुणाने आजीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दिपक जमदाडे करत आहेत.