वाघोलीतील थकीत स्ट्रीट लाईट बिल महापालिका भरणार
दिवाबत्ती खर्चातील तरतूद वापरणार; वाघोलीसह २३ गावांची बिले भरली जाणार

- २३ गावांमधील बांधकाम परवानगी देणार पालिका : पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या वाघोलीसह २३ गावांमधील बांधकाम परवानग्या महापालिकाच देणार आहे. सुरुवातीला पीएमआरडीए या गावांमध्ये परवानगी देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. मात्र पीएमआरडीएने या गावांमधील बांधकाम प्रस्ताव दाखल करून घेणे बंद केले असल्याने याबाबत स्पष्टता नव्हती. पालिका नगररचना विभागाची बैठक मंगळवारी (दि.१३) पार पडल्यानंतर या गावांमधील प्रस्ताव दाखल करून घेण्याचे आदेश संबंधितांना दिले गेले. अडचण येऊ नये म्हणून सदरचे प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहेत.
वाघोली : पुणे महापालिका हद्दीत एक जुलैपासून समाविष्ट झालेल्या वाघोलीसह २३ गावांची थकीत स्ट्रीट लाईट, कार्यालये, शाळा आदींची लाईट बिले पुणे महानगरपालिका भरणार आहे. थकीत बिले भरण्यासाठी सन २०२०-२१ पथवरील दिवाबत्ती खर्चातील तरतूद वापरण्यात येणार आहे.
महावितरणकडे नव्याने पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांची एकूण साडे चार कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये १ कोटी ८७ लाख रुपयांची सर्वाधिक थकबाकी एकट्या वाघोली गावाची आहे. अनेक वर्षांपासूनची थकबाकी असल्याने महावितरणने कठोर भूमिका घेऊन स्ट्रीट लाईटचे कनेक्शन तोडले आहे. वाघोलीतील बहुतांश रस्ते अंधकारमय झाले आहेत. यावर सोशल मिडिया, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती व प्रसारमाध्यमांनी देखील आवाज उठविला होता. समाविष्ट गावांचे रस्ते अंधकारमय होऊ नये याची काळजी महापालिकेने घेऊन याकरिता साडे चार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. स्थायी समितीच्या बैठकीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.