लोहगाव विमानतळाच्या १५ किलो मीटर परिसरात प्रखर लाईट लावण्यास बंदी
अप्पर पोलीस आयुक्तांचे आदेश; ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांना बसणार फटका
लोहगाव : लोहगाव एअर पोर्ट परिसरात प्रखर लाइट (बीम लाईट) लावण्यास पुणे पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ प्रमाणे प्रतिबंध लावले आहेत. विमानतळ परिसरातील १५ किलोमीटरच्या परिघामध्ये येणाऱ्या भागांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे लोहगाव, वाघोली, चंदननगर, खराडी विमाननगर, टिंगरेनगर, नगर रोड परिसरातील ३१ डिसेंबरसह, टेरेसवर चालणाऱ्या पार्ट्या, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना फटका बसण्याची शक्यता आहे.
अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यानी काढलेल्या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, लोहगाव टेक्नीकल विमानतळ व नागरी विमानतळ, पुणे येथे दिवसा व रात्री वेगवेगळ्या एअर लाईन्सची व भारतीय वायु सेनेचे विमाने, हेलिकॉप्टर उतरत असतात व उड्डाण करीत असतात. रात्रीचे वेळी वैमानिकांना दिशा व ठिकाण दाखविण्यासाठी रनवेवर व एटीसी टॉवरकडून संकेतासाठी लाईटचा उपयोग करण्यात येतो.
भारतीय वायुसेनांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, लोहगाव विमानतळाचे वायुक्षेत्राचे (Air Field) जवळच्या परिसरात विविध कार्यक्रमाच्या वेळेस आकाशामध्ये प्रखर लाईट बीम (Light Beam)चा उपयोग करण्यात येतो. अशा प्रखर लाईट बीममुळे वैमानिकांचे डोळे दिपून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यानुसार अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये असा आदेश दिला आहे. लोहगाव वायुसेना व नागरी विमानतळाच्या साधारणपणे १५ कि.मी. अंतराच्या वायुक्षेत्र (Air Field) परिघामध्ये (Radius) पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत खालील कृत्यांवर प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणत्याही माणसाने किंवा कार्यक्रम आयोजकांनी प्रखर लाईट बीम आकाशात सोडू नये. सदरचा आदेश दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी पासून दोन महिन्यांसाठी लागू रहाणार आहे. सदरच्या आदेशांचे उल्लंघन करणारी व्यक्ती भादवि कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे देखील अप्पर आयुक्त पोकळे यांनी आदेशात नमूद केले आहे.