तुळापुर येथे घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक
लोणीकंद पोलीस तपास पथकाची कामगिरी; १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

- »» विश्वजीत काइंगडे लोणीकंद पोलीस स्टेशनला रुजू झाले असून अल्पावधीतच सर्वसामान्यांचा मित्र तर गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळख निर्माण केली. गुन्हेगारांवर वचक निर्माण करून विविध गुन्ह्यांचा उकल केला असून गुन्हेगारांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
वाघोली : कडी कोयंडा तोडून दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून मुळगावी पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्यास लोणीकंद पोलिस तपास पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याचेकडून एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सचिन साधू एखंडे (वय ३३ वर्षे रा. कुंजीरवाडी, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळापुर येथे दि. २७ ऑगस्ट रोजी भरदिवसा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून २ तोळे सोन्याचे दागिन्यांची चोरी गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी तपासी पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांचे नेतृत्वाखाली तपास पथक तयार करुन सदर गुन्ह्याचा तपास करून उघडकीस आणण्याकरीता सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथक तपास करत असताना तुळापुर येथे घरफोडी करणारा आरोपी हा धाराशिव (उस्मानाबाद) येथे त्याच्या मुळगावी पळून जात असल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर मिळाली. माहिती मिळताच लोणीकंद तपास पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता चोरी केली असल्याची त्याने कबुली दिली. त्याचेकडून एकूण १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची मोटार सायकल व दोन तोळे एक ग्रामचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सपोनि रविंद्र गोडसे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त शशीकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिमा ढाकणे, लोणीकंद तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोना सागर जगताप, पोना साळुंके, पोशि साई रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे, मल्हारी सपुरे यांनी केली आहे.