घरफोडी करणाऱ्या सराईतासह साथीदार जेरबंद  

लोणीकंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; १३ तोळे सोन्याची लगड जप्त

वाघोली : भरदिवसा घरफोडी करून तेरा तोळे सोन्याचे दागिन्यांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास त्याच्या साथीदारासह लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचेकडून सात लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने (वय ३० रा. चाफेकर चौक, चिंचवड), प्रमोद उर्फ पप्पू विलास पाटोळे (वय २५  काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केसनंद वाडेबोल्हाई रोडवरील फ्लॅटमध्ये देऊळाबाई आल्हाट व त्यांची बहिण पद्मा वास्तव्यास असून मंगळवारी (११ जुलै) सकाळी फ्लॅट बंद करून कामाला गेल्या होत्या. संध्याकाळी घरी आल्यावर फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे व सामान अस्तव्यस्त पडल्याचे दिसून आले. दरम्यान त्यांना कपाटातील १३ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्जीत काइंगडे यांनी तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांचे नेतृत्वाखाली दोन तपास पथके तयार करून गन्हा उघडकीस आणण्याकरिता सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दोन्ही पथके शिक्रापूर व दौंड भागात पथके तपास करत होते. परंतु कठीण परिश्रम घेवून सुद्धा गुन्ह्याचा उकल होत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी मागील काळात जेलमधून सुटलेल्या आरोपींची माहिती घेण्याचे काम सुरु केले. परंतु पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळत नव्हती. तरी देखील खचून न जाता दोन्ही पथकाने तपास सुरूच ठेवला.

तपास सुरु असताना सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोशि साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दीपक कोकरे यांना पिंपरी परिसरात दिवसा घरफोड्या करणारा आरोपी जेलमधून सुटला असल्याची माहिती मिळाली. आरोपी हा लोणीकंद परिसरात येऊन गेल्याची सुद्धा माहिती पोलिसांना त्यांचे खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली. त्याचेकडे चौकशी केली असता गुन्ह्याची माहिती देण्यास टाळाटाळ करू लागला. पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा केल्याची कबुली देत सोन्याची कशाप्रकारे विल्हेवाट लावली याची माहिती दिली. पोलिसांनी तपासात आणखी एका साथीदाराला ताब्यात घेवून अटक केली. त्यांचेकडून एकूण सात लाख रुपये किंमतीची १३ तोळे सोन्याची वितळून केलेली लगड जप्त करण्यात आली. पोलिसांनी कठोर परिश्रमाने तपास करून अखेर गुन्हा उघडकीस आणण्यास यश मिळविले.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कष्ट करणाऱ्या दोन बहिणीचे सोने त्यांना लवकरच कोर्टाच्या आदेशाने देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी सांगितले. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक गोडसे करत आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त शशीकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोनि मारुती पाटील, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक विनायक साळवे, सागर जगताप, पोलीस शिपाई साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, आशिष लोहार, गणेश डोंगरे, महिला पोलीस शिपाई प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button