वाघोलीतील कंपनीवर कारवाई करा
पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस सातव यांची कामगार आयुक्तांकडे मागणी; कंपनीतील कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत वाघोलीमध्ये यापूर्वी गोडाऊन, कंपन्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या जीवितला धोका निर्माण करणाऱ्या सिस्का कंपनीची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी अप्पर कामगार आयुक्त तसेच सहायक आयुक्त वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेतेच्या उपाययोजना नसल्याने त्यांना जीव गमवावा लागला आहे. वाघोली येथील कटकेवाडी येथे असणाऱ्या सिस्का कंपन्यात काम करताना कामगारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, हॅन्ड ग्लोज, सेफ्टी बेल्ट अथवा विजेचा धोका उद्भवू नये यासाठीच्या उपाययोजना करणारी साहित्य देण्यात आली नाहीत. विजेची उपकरणे अतिशय दुरावस्थेत असल्यामुळे विजेची उपकरणे चालू करताना विजेचा शॉक लागण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. कंपनीच्या आवारात विद्युत तारांचा कोणताही मेंटेनन्स केला जात नसल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. कंपनीत विजेचा शॉक लागून मोठी दुर्घटना घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंपनीची अग्निशामक यंत्रणा मेंटेनेस अभावी कुचकामी झाली आहे. वेअर हाऊसची देखभाल करण्यासाठी गाडीच्या टपावर चढून बळजबरीने कामगारांकडून काम करून घेतले जात आहे. कामगारांसाठी कोणत्याही प्रथमोपचाराची अथवा मेडिकल बॉक्सची सुविधा कंपनीमध्ये नाहीत. त्याचबरोबर महिला सफाई कामगारांसाठी कोणत्याही प्रकारची स्वच्छतागृहे नसल्याने महिला कामगारांची मोठी कुचंबना होत आहे. पुरुषांसाठी स्वच्छतागृहे आहेत परंतु कामगारांच्या संख्येच्या प्रमाणात नाहीत. आहेत त्यांची अत्यंत दुरावस्था असून आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सातव यांनी निवेदनात नमूद केले आहे.
कंपनीकडून कामगारांना कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने कामगारांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. माहे मे २०२३ च्या कालावधीत वाघोलीत कंपनी व गोडाऊन झाल्याच्या तीन घटना घडल्या असून त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सिस्का कंपनीची चौकशी होऊन कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी या संबंधित कंपनीवर चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी भाजप नेते संदीप सातव सातव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
वाघोली गोडाऊन व कंपनी जळालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनीची चौकशी करून कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – सोमनाथ बनकर (सहाय्यक आयुक्त, वडगावशेरी, क्षेत्रीय कार्यालय)
कामगारांच्या पगार व बोनस मिळवून देण्यासाठी तातडीने कामगार उपायुक्त गीते यांनी योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले आहे. कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबत औद्योगिक सुरक्षा संचालनालय यांच्याकडे संपर्क साधण्यात यावा.
– शैलेंद्र पोळ (अप्पर आयुक्त, कामगार, पुणे)