बाह्यवळण रस्त्याचे काम सुरु करण्याची मागणी
संदीप थोरात यांचे पीएमआरडीएला लेखी निवेदन
- बाह्यवळण रस्त्याचे फायदे...
- » नागरिकांना कोंडीतून मुक्तता मिळेल
- » नोकरदार, कामगारांचा वेळ वाचेल
- » वाहनधारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होईल
- » रुग्णांना लवकर हॉस्पिटलमध्ये पोहचवणे शक्य होईल
वाघोली : हवेली तालुक्यातील प्रादेशिक योजनेतील खांदवेनगर (जकात नाका) ते कटकेवाडी तीस मीटर रुंदीचा बाह्यवळण रस्त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. परंतु प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांच्या इच्छाशक्ती अभावी गेली काही वर्षांपासून रस्त्याचे अद्यापही काम सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे लवकरच बाह्यवळण रस्त्याचे काम सुरु करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सचिव संदीप थोरात यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे-नगर महामार्गावरून वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या महामार्गावर रांजणगाव येथे पंचतारांकित औद्योगिक विकास महामंडळ आहे. त्यामुळे रांजणगाव एमआयडीसी मधील कंपन्यांसह मराठवाडा, विदर्भाकडून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे. त्यातच वाघोली, भावडी, लोणीकंद परिसरात असणाऱ्या दगड खाणीवरील अवजड वाहनांबरोबरच गोडावून, शाळा, महाविद्यालयांच्या वाहनांची देखील वर्दळ असल्याने वाघोलीतील वाहतूक समस्या अतिशय जटील बनली आहे.
वाघोलीहून विविध ठिकाणी नोकरी निमित्त अधिकारी, कर्मचारी व कामगारांना ये-जा करावी लागते. रोजच्याच कोंडीमुळे ग्रामस्थांसह कर्मचारीवर्ग त्रस्त झाला आहे. जेष्ठ नागरिक, महिला, शाळकरी छोटी मुले यांना रस्ता ओलांडताना मोठी जोखीम पत्करावी लागत आहे.
खांदवेनगर (जकात नाका) ते कटकेवाडी बाह्यवळण रस्त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली असताना अद्यापही रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली नाही. वाघोलीसाठी कुठलाही बाह्यवळण नसल्याने नागरिकांची कोंडीतून मुक्तता व्हावी या दृष्टीने बाह्यवळण रस्त्याला मंजुरी देण्यात आली. परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे गेली काही वर्षांपासून रस्त्याच्या कामाला मुहूर्तच मिळत नसल्याने कोंडीपासून मुक्तता कधी मिळणार असा प्रश्न वाहनधारकांसह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
वाहनधारकांना पर्यायी मार्गच नसल्याने वाहतूक पोलीस सुद्धा हतबल झाले असून त्यांना नागरिकांचा रोष पत्करावा लागत आहे.
प्रादेशिक योजनेतील खांदवेनगर (जकात नाका) ते कटकेवाडी तीस मीटर रुंदीचा बाह्यवळण रस्त्याच्या काम सुरु करून नागरिकांना कोंडीतून मुक्तता करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सचिव संदीप थोरात यांनी पीएमआरडीएकडे केली आहे.