शाळा, कॉलेज परिसरात ‘निर्भय विद्यार्थी’ अभियान

पोलीस काका व पोलीस दीदी बनणार मुलींचे सुरक्षा कवच; नागरिकांमधून उपक्रमाचे स्वागत   

वाघोली : (राहुल बागल) शाळा, महाविद्यालय परिसरात रोड रोमियोंचा वाढता वावर लक्षात घेता पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे सुचनेनुसार ‘निर्भय विद्यार्थी’ अभियान राबवण्यात येणार आहे. या अनुषंगाने लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये नुकतीच प्राचार्य व शिक्षकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी उपस्थितांना मुलींच्या सुरक्षिततेबाबत माहिती दिली. तसेच पोलीस काका व पोलीस दीदी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शाळा व महाविद्यालय परिसरात घिरट्या घालणाऱ्या रोड रोमियोंवर चांगलाच चाप बसणार आहे. नागरिकांमधून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

काही दिवसांपूर्वी भरदिवसा पुण्यात एका तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यानुषंगाने पोलीस विभाग सुद्धा सतर्क झाला आहे. शाळा व महाविद्यालय परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या रोड रोमियो व टवाळखोरांवर पोलिसांकडून कारवाई सत्र सुरु आहे. परंतु रोड रोमियोंचा कायम बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘निर्भय विद्यार्थी’ अभियान राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सर्व शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक यांची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी प्रत्येक शाळा, महाविद्यालयामध्ये नेमण्यात आलेल्या पोलीस काका व पोलीस दीदी यांची उपस्थितांना माहिती दिली.  त्याचबरोबर सदर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक काइंगडे यांनी उपस्थित प्राचार्य व शिक्षक यांना केले.

शाळा, महाविद्यालयासाठी नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस काका आणि पोलीस दीदी यांचा संपर्क क्रमांक असलेले फलक प्राचार्य व शिक्षकांना देण्यात आले आहेत. सदरील फलक शाळा परिसरात व शाळा, कॉलेजच्या प्रथमदर्शनी लावण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींना व पालकांना असुरक्षित वाटल्यास संपर्क करण्यासाठी मदत होणार आहे.

मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा, कॉलेजच्या परिसरात ‘निर्भय विद्यार्थी’ अभियान राबवण्यात येत आहे. पोलीस काका व पोलीस दीदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला, मुलींनी पोलीस काका व पोलीस दीदी यांचा नंबर सेव करावा. मुलींना असुरक्षित वाटल्यास पोलीस काका, पोलीस दीदी यांच्याशी तात्काळ संपर्क केल्यास होणारी संभाव्य गंभीर घटना टाळता येवू शकते.

– विश्वजीत काइंगडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद)

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button