चाकूने भोसकून प्रेयसीने केला प्रियकराचा खून
वाघोलीतील रायसोनी कॉलेज रोडवरील घटना; प्रेयसीने हाताची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न

वाघोली: प्रेयसीने प्रियकरावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली येथील रायसोनी कॉलेज रोडवर खाजगी वस्तीगृहात सोमवारी (दि. २९) पहाटेच्या सुमारास घडली. प्रियकराचा खून करून प्रेयसीने स्वतःची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता परंतु तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. प्रेम प्रकरणातून झालेल्या खुनाच्या घटनेने वाघोलीत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
यशवंत अशोक मुंढे (वय २२ सध्या रा. वाघोली, मुळगाव लातूर) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे तर अनुजा महेश पन्हाळे (वय २१ वर्षे रा. वाघोली, मुळगाव अहमदनगर) असे खून करणाऱ्या प्रेयसीचे नाव आहे. दोघेही रायसोनी कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होते.
याबाबत मिळालेला माहितीनुसार अनुजा व यशवंत मध्ये प्रेम संबंध होते. तो सारखा तिच्यावर संशय घेत होता त्यामुळे त्यांच्यात भांडणे व्हायची. तो तिला अनेक बंधने घालत होता. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ती त्याच्या खाजगी वस्तीगृहातील खोलीत अभ्यासासाठी गेली. ते एका बेडरूम मध्ये होते तर खोलीतील बाकी विद्यार्थी दुसऱ्या बेडरूम मध्ये होते. मध्यरात्री त्यांचे पुन्हा भांडणे झाले. अनुजाने यशवंतच्या छातीवर व पोटावर वार केले यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर अनुजा खाली आली व हाताची नस कापून तिने इमारती समोरील खाऊ गल्लीतील बाकड्यावर बसली. तेथून जाणाऱ्या अन्य मुलांनी तिची अवस्था पाहून शंभर नंबरवर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळविले व तिला खाजगी रुग्णालय दाखल केले. पोलिसांना खुणाची घटना कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट दिली.
खासगी वस्तीगृहाची ही इमारत स्थानिक व्यक्तीच्या मालकीची असून ती दिल्लीतील खाजगी कंपनीने भाडे तत्त्वावर घेतली आहे. तेथे मुलांचे वस्तीगृह आहे. एका खोलीत चार ते पाच विद्यार्थी राहतात. तेथे प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा आहे. तेथेही सुरक्षा रक्षक त्यांचाच असतो तरी सुद्धा अनुजा हिने रात्री प्रवेश करून वर्ग मित्राचा भांडणातून खून केला. तेथील सुरक्षा रक्षक व खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. आम्हाला काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. अनुजाने स्वतःची नस कापल्याने रक्तस्त्राव झाला होता त्यामुळे तिला चक्कर येत होती. तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तिला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. ती धोक्याच्या बाहेर असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार करत आहेत.