वाघोलीतील साई सत्यम पार्क परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी
माजी जि.प. सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या पाठपुराव्याला यश

वाघोली : वाघोलीतील साई सत्यम पार्क व परिसरातील लोक वस्तीसाठी कमी प्रमाणात असणाऱ्या पाण्याच्या प्रश्नातून येथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. खराडी ते साई सत्यम पार्क पाण्याची लाईन कामासाठी जवळपास पन्नास लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिली. दाभाडे यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
वाघोली तालुका हवेली येथील साई सत्यम पार्क, कावडे वस्ती, कोलते पार्क, गणेश पार्क, रोज गार्डन या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे ग्रामपंचायतकडून होणारा पाण्याचा पुरवठा कमी पडू लागला होता. याबाबत परिसरातील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्याकडे पाणी प्रश्न मांडला होता. त्यानंतर दाभाडे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.